Virat Kohli and Rohit Sharma handed Test debuts Caps to Ishan Kishan and Yashasvi Jaiswal :
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात बुधवारपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली असून पहिला सामना डॉमिनिकामधील रोसौ येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यातून भारताकडून ईशान किशन आणि यशस्वी जयस्वाल यांचे कसोटी पदार्पण झाले.
पहिल्या सामन्यात नाणेफेकीला सुरुवात होण्यापूर्वी ईशान आणि जयस्वाल यांना कसोटी पदार्पणाची कॅप प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड गोलाकार थांबलेल्या भारतीय संघातील खेळाडूंमध्ये बोलत आहे. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा युवा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला कसोटी पदार्पणाची कॅप देत त्याचे अभिनंदन करतो. तसेच गळाभेट घेतो.
नंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ईशानला त्याच्या कसोटी पदार्पणाची कॅप देत त्याचे अभिनंदन करतो. यावेळी विराट ईशानच्या डोक्यावरून हात फिरवताना त्याची गळाभेटही घेतो. यानंतर जयस्वाल आणि ईशानचे सर्व भारतीय खेळाडूंकडून अभिनंदन केले जाते.
दरम्यान, जयस्वालसाठी हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना देखील ठरला आहे. त्यामुळे जयस्वाल भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 394 वा खेळाडू आहे. तसेच ईशानने यापूर्वी भारताकडून वनडे आणि टी20 क्रिकेट खेळले आहे. पण त्याचा कसोटीतील हा पहिलाच सामना आहे.
त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे ईशान आणि जयस्वाल 306 आणि 307 वे खेळाडू ठरले आहेत.
कसोटी पदार्पण करण्यापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज ईशानने त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 48 सामन्यांमध्ये 38.76 च्या सरासरीने 6 शतकांसह आणि 16 अर्धशतकांसह 2985 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 99 झेल आणि 11 यष्टीचीत केले आहेत.
जयस्वालने 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 80.21 च्या सरासरीने 9 शतके आणि २ अर्धशतकांसह 1845 धावा केल्या आहेत.
पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 64.3 षटकात 150 धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून अथानाझने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 20 धावा केल्या.
या दोघांव्यतिरिक्त वेस्ट इंडिजकडून या डावात कोणालाही 20 धावांचाही टप्पा गाठता आला नाही. भारताकडून अश्विनव्यतिरिक्त रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट् घेतली. तसेच ईशान किशनने या डावात २ झेलही घेतले.
तसेच भारताने पहिल्या दिवसाखेर 23 षटकात बिनबाद 80 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 70 धावांनी मागे आहे. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या दिवशी 65 चेंडूत 30 धावा करून नाबाद आहे. तसेच पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल 73 चेंडूत 40 धावा करून नाबाद आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.