Asia Cup Final: टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करुन आशिया कप 2023 ची ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ 15.2 षटकात 50 धावांवर ऑलआऊट झाला. मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले.
हार्दिक पांड्याने तीन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. त्याचवेळी भारताने हे लक्ष्य 6.1 षटकांत सहज गाठले आणि आठव्यांदा विजेतेपद पटकावले. सलामीवीर शुभमन गिल 27 धावांवर तर इशान किशन 23 धावांवर नाबाद राहिला.
स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर अंतिम फेरीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. सुंदरने विजेतेपदाच्या सामन्यात ना गोलंदाजी केली ना फलंदाजी. या सामन्यात त्याने एकही झेल घेतला नाही, असे असूनही सुंदरने अनोखा इतिहास रचला.
खरे तर, सुंदर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणारा आणि फलंदाजी, गोलंदाजी किंवा एकही झेल न घेता विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय ठरला आहे.
फायनलपूर्वी सुंदरचा भारतीय संघात अचानक समावेश करण्यात आला होता. फिरकीपटू अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे, सुंदरला 16 सप्टेंबरला कोलंबोला बोलावण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी तो अंतिम सामना खेळला.
दुखापतीमुळे अक्षरला श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) अंतिम सामन्याला मुकावे लागले. बांगलादेशविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती. अक्षरने बांगलादेशविरुद्ध आठव्या क्रमांकावर आल्यानंतर 34 चेंडूंत 42 धावांची तूफानी खेळी खेळली होती.
मात्र, या सामन्यात भारताला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या स्पर्धेतील भारताचा फायनलपूर्वीचा सामना बांगलादेशविरुद्ध होता.
दुसरीकडे, भारत (India) विरुद्ध श्रीलंका फायनल अवघ्या 129 चेंडूत संपली. सर्वात कमी चेंडूंमध्ये संपणारा हा तिसरा एकदिवसीय सामना आहे.
2020 मध्ये, नेपाळ विरुद्ध अमेरिका सामना 104 चेंडूत संपला तर 2001 मध्ये श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे सामना 120 चेंडूत संपला होता.
भारताने हा सामना 263 चेंडू शिल्लक असताना जिंकला. चेंडूंच्या बाबतीत श्रीलंकेचा हा सर्वात मोठा पराभव आहे. त्याचवेळी, एकदिवसीय अंतिम सामन्यात चेंडू शिल्लक असताना भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.