
ODI cricket India vs Australia: भारतीय क्रिकेट संघाचा 'रन मशीन' विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे, पण यावेळी चर्चा त्याच्या धावांची नाही, तर त्याच्या बॅटच्या शांततेची आणि मैदानावरच्या एका भावनिक क्षणाची आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत कोहलीने पहिल्यांदाच सलग दोन सामन्यांमध्ये शून्य धावांवर (डक) बाद होण्याची लाजिरवाणी कामगिरी केली. पण या निराशाजनक फॉर्मपेक्षाही अधिक चर्चा झाली ती ॲडलेड ओव्हलवरून माघारी परतताना त्याने केलेली कृती.
जवळपास सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या कोहलीसाठी ही मालिका फारशी चांगली ठरली नाही. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आता फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळत आहे. पर्थमधील पहिल्या सामन्यात त्याला मिचेल स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद व्हावे लागले.
फक्त ८ चेंडू खेळून तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर, तीन दिवसांनी ॲडलेडमध्ये झेवियर बार्टलेटने त्याला अप्रतिम गोलंदाजीने जाळ्यात अडकवले. बार्टलेटने काही चेंडू बाहेर टाकून कोहलीला सेट केले आणि त्यानंतर आत येणाऱ्या फुल लेन्थ चेंडूवर त्याला पायचीत (LBW) पकडले. कोहलीने रोहित शर्माशी चर्चा केली, पण रिव्ह्यू (DRS) न घेण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य असल्याचे बॉल ट्रॅकरने सिद्ध केले.
ॲडलेड ओव्हल हे कोहलीसाठी नेहमीच एक मजबूत किल्ला राहिले आहे. परदेशी फलंदाजांमध्ये या मैदानावर (सर्व फॉरमॅटमध्ये) सर्वाधिक ९७५ धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्यामुळे, तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. मात्र, अवघ्या चार चेंडूत बाद झाल्यानंतर त्याने पॅव्हेलियनकडे परतताना आपला उजवा हात वर करून प्रेक्षकांना एक शांत निरोप दिला. त्याने हाताने 'गुडबाय' केल्याचे अनेकांनी पाहिले.
हा अनपेक्षित आणि कोहलीच्या स्वभावाला न शोभणारा 'गुडबाय' क्षण लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला. सलग दोन 'डक' पेक्षाही अधिक चर्चा या निरोपाची झाली. अनेक चाहत्यांच्या मनात आणि सोशल मीडियावर एकाच प्रश्नाने घर केले; हा ॲडलेडमधील त्याचा शेवटचा सामना असल्यामुळे दिलेला निरोप होता की, एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा हा एक संकेत होता?
सलग दोन शून्यांनी कोहलीच्या कारकिर्दीत एक मोठी पोकळी निर्माण केली आहे. एकीकडे, त्याच्यासारख्या महान फलंदाजासाठी हा फॉर्म तात्पुरता असू शकतो. पण दुसरीकडे, टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याला अपेक्षित यश मिळत नसल्यामुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा प्रवास आता कोणत्या दिशेने जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ॲडलेडच्या मैदानावरचा 'तो' निरोप भारतीय क्रिकेटच्या एका गौरवशाली अध्यायाच्या संभाव्य समाप्तीची सुरुवात तर नाही ना, असा प्रश्न क्रिकेट रसिकांना पडला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.