Virat Kohli Performance in ODI Cricket World Cup Semi-Final:
बुधवारी (15 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड संघात वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहेत.
मात्र असे असले तरी इतिहास पाहाता विराटच्या वर्ल्डकपमधील उपांत्य सामन्यांमधील कामगिरी फारशी चांगली नाही. विराटने आत्तापर्यंत 2011 वर्ल्डकप, 2015 वर्ल्डकप आणि 2019 वर्ल्डकप अशा तीन वनडे वर्ल्डकपमध्ये उपांत्य सामना खेळला आहे. त्यातील 2011 वर्ल्डकपमध्ये भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता आणि विजेतेपद जिंकले होते.
दरम्यान, विराटने 2011 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेला उपांत्य सामना खेळला होता. त्यावेळी तो 9 धावांवर बाद झाला होता. त्याला वहाब रियाझने बाद केले होते. त्यानंतर 2015 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात उपांत्य सामना झाला होता.
या सामन्यात विराटला अवघ्या एका धावेवर मिचेल जॉन्सनने बाद केले होते, तर 2019 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच भारताचा उपांत्य सामना झाला होता. त्या सामन्यातही विराटला एक धावेवर ट्रेंट बोल्टने बाद केले होते.
विराटची ही उपांत्य सामन्यातील कामगिरी भारतासाठी चिंताजनक आहे. पण आता विराटही उपांत्य सामन्यातील त्याच्या खराब कामगिरीचा इतिहास बदलण्यासाठी उत्सुक असेल.
विराटने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत 9 सामन्यांत 99 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. यात 2 शतकांचाही समावेश आहे. तो या स्पर्धेत सध्या सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू आहे.
दरम्यान, विराटची बुधवारी वनडे क्रिकेटमधील 50 व्या शतकावरही नजर असेल. विराटने आत्तापर्यंत वनडेत 49 शतके केली आहेत. त्यामुळे सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट अव्वल क्रमांकावर आहे.
त्याच्यासह संयुक्तरित्या सचिन तेंडुलकरही 49 वनडे शतकांसह अव्वल क्रमांकावर आहे. आता विराटला सचिनला मागे टाकण्याची संधी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.