

Simon Doull PraisesVaibhav Sooryavanshi: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीतील पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने वारंवार व्यत्यय आणला खरा, मात्र याच दरम्यान साता समुद्रापार एका 15 वर्षांच्या भारतीय क्रिकेटपटूची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आयपीएलचा नवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी आहे.
वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वैभवने आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेट जगताला कशा प्रकारे भुरळ घातली, याची प्रचिती लॉर्ड्स कसोटी दरम्यान आली. न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक सायमन डूल यांनी वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना, त्याला लवकरात लवकर भारतीय संघात (Team India) स्थान देण्याचा सल्ला निवड समितीला दिला.
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी जेव्हा पावसामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा 'स्काय स्पोर्ट्स'च्या विशेष शोमध्ये सायमन डूल यांना वैभवबाबत विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना डूल म्हणाले की, वैभव सध्या केवळ 15 वर्षांचा असला तरी तो अत्यंत प्रतिभावान आणि परिपक्व खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये (IPL) चमकदार कामगिरी करत सर्वाधिक धावा कुटल्या आणि तब्बल 5 पुरस्कार आपल्या नावावर केले. डूल पुढे म्हणाले, "भारतीय संघात त्याला कोणत्या क्रमांकावर खेळवावे हे मला ठाऊक नाही, पण त्याला लवकरात लवकर भारतीय संघात समाविष्ट केले पाहिजे."
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये बॅटने दाखवलेल्या अद्भूत कौशल्यामुळे त्याला वरिष्ठ भारतीय संघात स्थान देण्याची मागणी आता प्रचंड वेगाने जोर धरु लागली. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी वैभवची संघात निवड होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. भारतीय संघ जून महिन्याच्या अखेरीस युके (UK) दौऱ्यावर जाणार असून, तिथे आधी आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची टी20 मालिका आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. या दौऱ्यासाठी 6 जून रोजी भारतीय संघाची अधिकृत घोषणा होणार असून, त्यात वैभवचे नाव आघाडीवर असण्याची शक्यता आहे.
2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक गेम्स आणि आगामी टी20 विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता, वैभवला आतापासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार होण्याची पूर्ण संधी बीसीसीआयला द्यायची आहे. तत्पूर्वी, 9 जूनपासून श्रीलंकेत सुरु होणाऱ्या 'अ' संघांच्या त्रिकोणी मालिकेत वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. या फॉरमॅटमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे निवड समितीसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.