न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात शुक्रवारी वनडे मालिकेतील पहिला सामना झाला. ऑकलंड येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 7 विकेट्सने विजय मिळवला. असे असले तरी या सामन्यात भारताकडून युवा गोलंदाज उमरान मलिकने आपल्या कामगिरीने प्रभावित केले.
उमरान मलिकसाठी त्याच्या गोलंदाजीतील वेग ही त्याची ओळख बनली आहे. त्याचा हा तिखट मारा पहिल्या वनडेतही पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या सामन्यात उमरान मलिकने वनडे पदार्पणही केले.
उमरान मलिकची वेगवान गोलंदाजी
आपल्या पदार्पणाच्या वनडे सामन्यातच उमरानने (Umran Malik) जवळपास सातत्याने ताशी 145-150 किमी वेगाने गोलंदाजी केली. त्याला कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) पॉवरप्ले नंतर म्हणजेच डावाच्या 11 व्या षटकात गोलंदाजीसाठी चेंडू हातात दिला.
उमराननेही त्याला मिळालेल्या या संधीचा फायदा घेत पहिल्याच षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेगवान चेंडूंनी त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या पहिल्या सहा चेंडूची गती अनुक्रमे ताशी 145.9, 143.3, 145.6, 147.3, 137.1, 149.6 किमी अशी होती. त्याने त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूही ताशी 150 किमी वेगाने फेकला होता.
इतकेच नाही तर त्याने त्याच्या वैयक्तिक तिसऱ्या षटकात सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वेगवान चेंडू फेकला. त्याने डावातील 16 व्या षटकातील दुसरा चेंडू ताशी 153.1 किमी वेगाने टाकला होता. विशेष म्हणजे त्याआधीच्याच चेंडूवर त्याने डेवॉन कॉनवेला बाद करत त्याची पहिली वनडे विकेट घेतली होती. त्याच्याआधी याच सामन्यात लॉकी फर्ग्यूसनने ताशी 153.4 किमी वेगाने एक चेंडू फेकला होता.
उमरानेचे शानदार पदार्पण
उमरानचा हा वेग पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. उमराननेही त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेत 10 षटकात 6.6 च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करत दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला. त्याने कॉनवेनंतर डॅरेल मिशेललाही बाद केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.