Afghanistan U19 vs India U19, Tri Series Match:
भारताचा 19 वर्षांखालील मुलांचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या भारत दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या 19 वर्षांखालील संघांबरोबर तिरंगी वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यान, या मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने प्रवेश निश्चित केला आहे.
गुरुवारी (4 जानेवारी) भारताच्या युवा संघाचा साखळी सामना अफगाणिस्तानविरुद्ध जोहान्सबर्गला झाला, ज्यात भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला आणि अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले. या मालिकेतील हा भारताचा सलग तिसरा विजय होता.
भारताने यापूर्वी पहिल्या साखळी सामन्यातही अफगाणिस्तानला पराभूत केले होते, तसेच दुसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. आता पुन्हा अफगाणिस्तानला पराभवाचा धक्का दिला.
भारताचा अखेरचा साखळी सामना बाकी असून हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. तसेच अंतिम सामना 10 जानेवारीला होणार आहे. अद्याप भारताविरुद्ध अंतिम सामन्यात अफगाणिस्तान की दक्षिण आफ्रिका खेळणार, हे निश्चित झालेले नाही.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यात अफगाणिस्तानने विजयासाठी 89 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 12.1 षटकातच 1 विकेट गमावत पूर्ण केला. भारताकडून आदर्श सिंग आणि इन्नेश महाजन यांनी चांगली सुरुवात केलेली.
मात्र, त्यांची ४९ धावांची भागीदारी आल्लाह घजनफरने तोडली. त्याने इन्नेशला १६ धावांवर बाद केले. पण नंतर मुशीर खानने आदर्शला चांगली साथ दिली. या दोघांनी १३ व्या षटकात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आदर्शने 39 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह 52 धावांची नाबाद खेळी केली. तसेच मुशीर 14 धावांवर नाबाद राहिला.
तत्पुर्वी, भारताचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. याचा फायदा भारतीय गोलंदाजांनी उचलला. भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 33 षटकांतच 88 धावांवर सर्वबाद केले.
या सामन्यात भारताकडून नमन तिवारीने भेदक गोलंदाजी केली. त्याला धनुष गौडा आणि प्रियांशू मोलिया आणि आराध्य शुक्ला या अन्य भारतीय गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे एका क्षणी अफगाणिस्तानचा संघ 8 धावांवर 4 विकेट्स असा कोलमडला होता.
नंतर सोहिल खान झुरमताई, नासिर हसन आणिरहिमुल्लाह झुरमती यांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला. या तिघांनाच अफगाणिस्तानकडून 10 धावांचा टप्पा पार करता आला. मात्र तेही मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ 88 धावांवरच कोलमडला.
भारताकडून नमन तिवारीने 7 षटकात 11 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच धनुष गौडा, आराध्य शुक्ला आणि प्रियांशू मोलिया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.