Tokyo Olympic: आणखी एका ऑलिंपिक ‘सेवे’ची इच्छा ः लेनी

Tokyo Olympic: आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बॉक्सिंग कृती दलाकडून नियुक्ती
Lenny D`Gama with officials at the Tokyo Olympic Boxing Championships.
Lenny D`Gama with officials at the Tokyo Olympic Boxing Championships.Dainik Gomantak

पणजीः ऑलिंपिकमध्ये जबाबदारी पार पाडण्याचे अंतिम ध्येय टोकियोत साकार झाले, तरीही बॉक्सिंगमध्ये योगदान देण्याची उत्कटता कायम आहे, त्यातूनच आणखी एका ऑलिंपिक सेवेची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया बॉक्सिंगमधील आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (Boxing International Technical Officer) लेनी डिगामा (Lenny D`Gama) यांनी गोव्यात परतल्यानंतर दिली. टोकियो ऑलिंपिकसाठी (Tokyo Olympic) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या बॉक्सिंग कृती दलाने लेनी यांची मूल्यांकनकर्ते-निरीक्षक या पदासाठी नियुक्ती केली. स्पर्धेसाठी पाच मूल्यांकनर्ते होते, त्यात 67 वर्षीय लेनी केवळ एकमेव भारतीय, तसेच आशियाई होते. टोकियोतील मोहीम आटोपून लेनी शनिवारी गोव्यात परतले.

Lenny D`Gama with officials at the Tokyo Olympic Boxing Championships.
गोव्याचे 'लेनी डिगामा' ऑलिंपिक बॉक्सिंगसाठी मूल्यांकनकर्ते

‘‘बॉक्सिंगमध्ये मी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप योगदान दिले आहे. प्रत्यक्ष ऑलिंपिक स्पर्धेत जबाबदारी पेलण्याची संधी मिळेल याबाबत मी विचार केला नव्हता, संधी मिळाली आणि काम परिपूर्णपणे बजावले याचेच जास्त समाधान आहे. ऑलिंपिक बॉक्सिंगमध्ये मूल्यांकनर्ता या नात्याने जबाबदारी पेलणारा पहिला गोमंतकीय ही भावना खूपच खास होती, केवळ भारताचेच नव्हे, तर आशियाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानास्पद ठरले,’’ असे लेनी म्हणाले. ‘‘पुढील काळात राज्यात बॉक्सिंगच्या प्रगतीसाठी झटणार आहे. बॉक्सिंगप्रती माझे आयुष्य समर्पित आहे. गुणवत्ता हुडकून त्यास खतपाणी घालण्याचे काम सुरूच राहील. त्याचवेळी आणखी एक ऑलिंपिकही खुणावत आहे,’’ असे लेनी यांनी नमूद केले. पुढील ऑलिंपिक स्पर्धा 2024 साली पॅरिसमध्ये होईल.

टोकियोत तटस्थ बॉक्सिंग!

‘‘टोकियो ऑलिंपिकमधील बॉक्सिंग स्पर्धा तटस्थ होती. पंचगिरीत चुकीला अजिबात थारा नव्हता. साहजिकच निकाल वादग्रस्त ठरले नाहीत. नियमाची अंमलबजावणी सक्तीने झाली, त्यामुळे गडबडीची संधीच नव्हती,’’ असे लेनी यांनी सांगितले. बॉक्सिंगमध्ये लेनी यांच्यासह एकूण पाच मूल्यांकनकर्ते नियुक्त होते. सारे मुल्यांकनकर्ते सकाळी नऊ वाजता स्टेडियमवर येत आणि अहवाल सादर करत, नंतर या अहवालाची प्राईसवॉटरहाऊस-कूपर्स संस्थेचे मूल्यांकनकर्ते अंतिम पडताळणी करत होते, त्यामुळे बॉक्सिंग निकालात फेरफार होण्याचा प्रश्नच नव्हता. स्पर्धेच्या कालावधीत सहा पंचांची कामगिरी लौकिकास साजेशी ठरली नाही. त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले, यामध्ये युरोपातील तिघे, आशिया, अमेरिका व आफ्रिकेतील प्रत्येकी एक होता, अशी माहिती लेनी यांनी दिली. ते 2012 पासून आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी या नात्याने जागतिक बॉक्सिंगमध्ये सक्रिय आहेत.

Lenny D`Gama with officials at the Tokyo Olympic Boxing Championships.
खूप काही साध्य करायचेय : लेनी

भारतीयांची कामगिरी निराशाजनक

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेस पाच पुरुष व चार महिला असे एकूण नऊ भारतीय पात्र ठरले होते. लोवलिना बोर्गोहिन हिचे एकमेव ब्राँझपदक वगळता भारतीयांची मोहीम अपयशीच ठरली, असे लेनी यांनी नमूद केले. ऑलिंपिकमधील बॉक्सिंग मोहीम यशस्वी ठरावी यासाठी भारत सरकारने कोट्यवधी रूपये खर्च केले, बॉक्सिंग महासंघानेही मेहनत घेतली, पण अखेर निराशाच पदरी पडली, असे गोवा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष असलेले लेनी यांनी सांगितले. 2024 मधील ऑलिंपिक स्पर्धेसाठी आतापासून नियोजन करण्याचे ठरले असून प्रशिक्षकही बदलले जाऊ शकतात अशी शक्यता लेनी यांनी व्यक्त केली.

लेनी यांनी पेललेली जबाबदारी

- आशियाई बॉक्सर नसलेल्या लढतीत मूल्यांकनकर्ते-निरीक्षक

- उपांत्य फेरीतील 26 पैकी 6 लढतीत नियुक्ती

- अन्य फेरीतील 6 लढतीत मूल्यांकनर्ते, तर 6 लढतीत निरीक्षक

- 3 अंतिम लढतीतील 2 लढतीत मूल्यांकनकर्ते, तर 1 लढतीत निरीक्षक

‘‘गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मी आभारी आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी नियुक्ती झाल्याचे वृत्त कळल्यानंतर त्यांनी मला खास बोलावून शुभेच्छा दिल्या. गोवा सरकारने टोकियो ऑलिंपिकसाठी आलेला खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे. मिळणारा सारा निधी मी बॉक्सिंग व खेळाच्या विकासासाठी वापरणार आहे. त्यासाठी ट्रस्ट सुरू करण्याचा विचार आहे.’’

- लेनी डिगामा

बॉक्सिंग आयटीओ

Lenny D`Gama with officials at the Tokyo Olympic Boxing Championships.
Tokyo Olympics: गोव्याचे लेनी टोकियोला रवाना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com