पणजी: केरळा ब्लास्टर्सने सलग तिसरा विजय नोंदवून रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थान मिळविले. शनिवारी त्यांनी चेन्नईयीन एफसीवर 1-0 फरकाने मात केली. आरएफ यंग चँप्सने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद करताना मुंबई सिटीला 2-0 फरकाने नमविले.
नागोवा येथे झालेल्या लढतीत 86व्या मिनिटास व्हिन्सी बार्रेटो याने केलेला गोल केरळा (Kerala) ब्लास्टर्ससाठी निर्णायक ठरला. त्यापूर्वी, चेन्नईयीनचा गोलरक्षक देवांश दाबास याने 72 व्या मिनिटास दक्षता प्रदर्शित करताना केरळा ब्लास्टर्सच्या गिवसन सिंग याचा पेनल्टी फटका अडविला होता. अपराजित कामगिरीसह केरळा ब्लास्टर्सने आता स्पर्धेत सर्वाधिक नऊ गुणांची कमाई केली आहे. चेन्नईयीन एफसीला दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तीन लढतीनंतर त्यांचा एक गुण कायम राहिला.
बाणावली येथील मैदानावर आरएफ यंग चँप्सने मुंबई सिटीवर वर्चस्व राखले. त्यांच्यासाठी गुलाब हिमबहादूर याने सातव्या, तर सी. के. रशिद याने 45व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला. अगोदरचे दोन सामने गमावलेल्या यंग चँप्सने पहिल्या विजयासह तीन गुण प्राप्त केले. मुंबई सिटीला ओळीने तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शून्य गुणासह ते तळात राहिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.