24 सप्टेंबर हा भारतीय क्रिकेट इतिहासातील अतिशय खास दिवस आहे. 14 वर्षांपूर्वी 2007 मध्ये आजच्याच दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या युथ ब्रिगेडने पाकिस्तानला (Pakistan) 5 धावांनी पराभूत करुन टी -20 विश्वचषक (T20 World Cup) जिंकला. भारतीय संघ (India team) चॅम्पियन होईल अशी कुणालाही अपेक्षा नव्हती, परंतु या युवा ब्रिगेडने अंदाज चुकीचे सिद्ध करून इतिहास घडवला. टी-20 विश्वचषकाच्या विजयाने क्रिकेटच्या सर्वात लहान प्रारुपाला नवी दिशा दिली. परिणामी, भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) 2008 मध्ये आयपीएल सुरु करण्याचा निर्णय घेतला.
गौतम गंभीरची शानदार खेळी
टी -20 विश्वचषकात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते, परंतु अंतिम सामना पाहता बरेच काही पणाला लागले होते. जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर (Wanderers Stadium) झालेल्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 157/5 चे आव्हानात्मक स्कोअर उभारला. सलामीवीर गौतम गंभीरने भारतासाठी 54 चेंडूत 75 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या डावात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. गंभीर व्यतिरिक्त युवा फलंदाज रोहित शर्माने देखील शेवटच्या षटकात नाबाद 30 धावा करुन महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघाची खराब सुरुवात झाली, अवघ्या 77 धावांवर पाकिस्तान संघाने सहा गडी गमावले. परंतु मिसबाह-उल-हक (43) ने मात्र संघाला तारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत अधिक वाढ झाली होती. मिसबाहने यासिर अराफत (15) आणि सोहेल तनवीर (12) यांच्यासह भागीदारी करुन पाकिस्तानला सामना जिंकण्याच्या स्थितीत आणले होते.
... अंतिम षटकाचा थरार
पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती, आणि एक विकेट शिल्लक होती. मात्र दुसरीकडे या रोमांचक वळणावर कर्णधार धोनीने गोलंदाजीची जबाबदारी वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माला दिली. जोगिंदर पहिलाच चेंडू वाइड टाकला. अशा स्थितीत आता पाकिस्तानला सहा चेंडूत 12 धावांची गरज होती. मिसबाहने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारुन टीम इंडियाला अडचणीत आणले. आता पाकिस्तानला चार चेंडूत सहा धावांची गरज होती. जोगिंदरच्या पुढच्या चेंडूवर मिसबाहने स्कूप शॉट खेळला आणि एका क्षणी असे दिसून आले की, चेंडू सीमेच्या बाहेर गेला मात्र फाइन लेगवर उभा असलेल्या श्रीशांतने तो कॅच घेतला.
शिवाय, वेगवान गोलंदाज इरफान पठाणने अंतिम सामन्यात चमकदार गोलंदाजी करत 4 षटकांत 16 धावा देऊन 3 बळी घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचबरोबर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी मालिकावीर ठरला. या स्पर्धेत 12 विकेट घेण्याव्यतिरिक्त आफ्रिदीने 91 धावाही केल्या.
कॅप्टन धोनीने 'ही' गोष्ट सांगितली होती
अंतिम सामना जिंकल्यानंतर कर्णधार धोनी म्हणाला होता, ''ही त्या गोष्टींपैकी एक आहे जी मी आयुष्यभर जपणार आहे. मला माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करायचे आहे. त्यांनी मला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कोणीही आम्हाला जिंकण्याची अपेक्षा केली नाही आणि आज आम्ही ज्या प्रकारे खेळलो, आम्ही एका मोठ्या उत्सहास पात्र आहोत.''
ऑस्ट्रेलियाचीही दमछाक झाली
उपांत्य फेरीत भारतीय संघाने महान ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. डर्बन येथे झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 188 धावा केल्या. युवराज सिंगने 30 चेंडूत 70 धावा केल्या, ज्यात 5 षटकार आणि अनेक चौकारांचा समावेश होता. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलिया 20 षटकांत केवळ 173/7 धावा करु शकला आणि भारताने सामना 15 धावांनी जिंकला. दुसरीकडे, पाकिस्तानने न्यूझीलंडचा सहा गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत मजल मारली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.