

पणजी: गोव्याचे माजी रणजी संघ कर्णधार, सफल फलंदाज स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्सचे (सीओई) क्रिकेट प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. आगामी १९ वर्षांखालील सीओई शिबिरासाठी स्वप्नील यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. स्वप्नील यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबमधील मोहाली येथे ११ मे ते ६ जून या कालावधीत प्रशिक्षण शिबिर होणार असून त्यात देशभरातील निवडलेल्या १९ वर्षांखालील प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. स्वप्नील यांच्याकडे फलंदाजी मार्गदर्शनाची जबाबदारी असेल.
बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून संधी मिळण्याची स्वप्नील यांची ही चौथी वेळ आहे. प्रारंभी १६ वर्षांखालील वयोगटातील शिबिरासाठी नियुक्ती झाल्यानंतर १९ वर्षांखालील वयोगटात त्यांच्याकडे सलग तिसऱ्या वर्षी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गतमोसमात त्रिपुरातील आगरताळा येथे स्वप्नील यांच्या मार्गदर्शनाखाली सीओई शिबिर झाले होते.
प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये २००१-०२ ते २०१७-१८ या कालावधीत स्वप्नील गोवा आणि दक्षिण विभागातर्फे एकूण ८८ सामने खेळले. १४ शतकांच्या मदतीने त्यांनी ५८८३ धावा केल्या. २००८ मध्ये आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या वर्षी ते राजस्थान रॉयल्सतर्फे यशस्वी ठरले होते. भारत अ संघाचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
४२ वर्षीय स्वप्नील हे बीसीसीआयचे लेव्हल २ प्रमाणित क्रिकेट प्रशिक्षक आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील मोसमात (२०२५-२६) त्यांनी केरळच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक-मेंटॉर या नात्याने योगदान दिले होते. एकदिवसीय स्पर्धेत या संघाचे ते प्रमुख प्रशिक्षक, तर कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत मेंटॉर होते. २०२४-२५ मोसमात स्वप्नील नागालँडच्या रणजी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असताना या संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत प्लेट गटातून एलिट गटासाठी पात्रता मिळविली होती. त्यापूर्वी, गोव्याच्या १९ वर्षांखालील आणि २३ वर्षांखालील वयोगट क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पदीही ते होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.