India vs Sri Lanka, T20I Series: भारत विरुद्ध श्रीलंका संघात मंगळवारपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव कसून सराव करताना दिसला आहे.
या मालिकेसाठी भारतीय वरिष्ठ निवड समीतीने विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याला भारतीय संघाचे कर्णधार करण्यात आले आहे, तर सूर्यकुमार यादव उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
सूर्यकुमारकडे पहिल्यांदाच भारतीय संघाची एवढी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, तोही त्याची चांगली लय कायम ठेवण्यासाठी नेट्समध्ये घाम गाळत आहे. त्याच्या नेट्समधील सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बीसीसीआयने शेअर केला आहे.
या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की 'नवे वर्ष, नवी सुरुवात. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी नवा उपकर्णधार. टी20 मालिकेतील मुंबईत होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाचे वानखेडे स्टेडियमवर पहिले सराव सत्र पार पडले.'
सूर्यकुमारला सर्वोत्तम टी20 खेळाडूसाठी आयसीसीचे नामांकन
सूर्यकुमार यादवला साल 2022 मधील आयसीसी सर्वोत्तम टी20 क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. त्याने गेल्या वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. दरम्यान, सूर्यकुमारने नव्या 2023 वर्षातही त्याचा दमदार फॉर्म कायम ठेवावा अशी अपेक्षा आता भारतीय संघाला असेल.
त्याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावाही केल्या होत्या. त्याने साल 2022 वर्षात 31 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने या वर्षात सर्वाधिक 68 षटकारही मारले.
तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 पेक्षा अधिक धावा करणारा दुसराच खेळाडू आहे. त्याच्याआधी असा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने केला होता. त्याने 2021 साली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 1326 धावा केल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.