

Suryakumar Yadav Dance Video Viral: आयपीएल 2026 चा थरार सध्या शिगेला पोहोचला असून मैदानातील चुरशीसोबतच खेळाडूंच्या मैदानाबाहेरील कृत्यांचीही मोठी चर्चा रंगत आहे. आतापर्यंत या हंगामात 6 सामने पार पडले असून 5 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. मात्र, सध्या क्रीडा विश्वात चर्चा आहे ती मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या एका भन्नाट डान्स व्हिडिओची. सूर्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या 'धुरंधर' चित्रपटातील 'रेहमान डकैत' या लोकप्रिय पात्राच्या शैलीत डान्स करुन चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचा हा अनोखा अंदाज सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये सूर्याच्या एका कार्यक्रमादरम्यान मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसत आहे. याच कार्यक्रमात त्याने 'रेहमान डकैत'ची सिग्नेचर स्टेप करुन उपस्थितांची दाद मिळवली. सूर्याला त्याच्या आक्रमक फलंदाजीसोबतच त्याच्या हजरजबाबीपणासाठी आणि बॉलिवूड प्रेमासाठी ओळखले जाते. यापूर्वीही त्याने अनेकदा चित्रपटांमधील आयकॉनिक सीन्स रिक्रिएट केले आहेत. सध्या भारतात 'धुरंधर' चित्रपटाची मोठी क्रेझ असून या चित्रपटाचा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर यशाचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. अशातच सूर्याने या चित्रपटातील डान्स स्टेप केल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
खेळाचा विचार करायचा झाल्यास, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच टी-20 विश्वचषक 2026 जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. विश्वचषकातील त्या मोठ्या यशानंतर सूर्या आता आयपीएलच्या मैदानात उतरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 8 चेंडूंमध्ये 16 धावांची खेळी खेळली. जरी ही खेळी मोठी नसली तरी त्याच्या बॅटमधून निघणारे फटके त्याने जुन्या लयीत असल्याचे संकेत देत होते.
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पुढील सामना 4 एप्रिल रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला असून सूर्यकुमार यादवकडून एका मोठ्या आणि धडाकेबाज खेळीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मैदानाबाहेर 'रेहमान डकैत'च्या रुपात धम्माल उडवल्यानंतर आता प्रत्यक्ष सामन्यात सूर्या आपल्या '360 डिग्री' फलंदाजीने दिल्लीच्या गोलंदाजांना कसे जेरीस आणतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या व्हिडिओवर चाहते भरभरुन प्रतिक्रिया देत असून सूर्याच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.