

कोलंबो: ज्या प्रकारे आम्हाला खेळ करायचा आहे, त्याच पद्धतीत आम्ही खेळ करतो. हाच आहे भारतीय संघाचा ब्रँड (खरी ओळख), अशा शब्दात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने रविवारी पाकिस्तानवर मिळवलेल्या शानदार विजयाचे वर्णन केले.
समोर प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी आम्ही याच पद्धतीने खेळ करतो, असे भारतीय कर्णधार म्हणाला. टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता किती तरी पटीने वाढवण्यात आली होती, परंतु भारतीय संघाने त्यांना शरण आणत ६१ धावांनी विजय मिळवून पाकिस्तानच्या आव्हानाचा फुगा फोडून टाकला.
सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला ‘‘हे आमचे ‘ट्रेडमार्क’ क्रिकेट आहे. एक बाद शून्य अशी स्थिती असतानाही आमच्या विचारात बदल झाला नाही.’’
या बहुचर्चित सामन्यात दोन्ही संघातील प्रमुख फरक ठरलेल्या ईशान किशनच्या खेळाचे सूर्यकुमारने कौतुक केले. देशांतर्गत स्पर्धेत ज्या विचाराने आणि पद्धतीने ईशान खेळत आहे, तसाच खेळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही करत आहे.
१ बाद ० अशी अवस्था झालेली असताना कोणीतरी जबाबदारी घेण्याची गरज होती आणि ईशानने ती सहजतेने स्वीकारली. प्रतिहल्ला करून त्याने सामन्याचे चित्रच बदलले, असे सूर्यकुमारने सांगितले.
खेळपट्टी सहजतेने धावा करण्यास साथ देणारी नव्हती, डावाच्या मध्यावर धावगती कमी झाली होती, परंतु तिलक वर्मा, शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांनी उत्तम फलंदाजी केली, असे सांगून सूर्यकुमार म्हणाला,
नेमक्या किती धावा निर्णायक ठरू शकतील, हे सांगणे कठीण होते, परंतु १७५ धावा केल्या तेव्हा आपण १५ ते २० धावा पुढे आहोत, याची जाणीव झाली.
कदाचित १५५ धावा असत्या, तर संघर्ष करावा लागला असता. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात विकेट मिळवून सनसनाटी निर्माण केली, तर जसप्रीत बुमराने तो क्रिकेट विश्वास सर्वोत्तम गोलंदाज आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने योगदान दिले. आता अहमदाबादमध्ये परतल्यावर सोमवारी विश्रांती घेऊ आणि बुधवारच्या नेदरलँडसविरुद्धच्या सामन्याची तयारी करू, असे सूर्यकुमारने सांगितले.
भारताविरुद्धच्या या सामन्यात आम्ही फिरकी गोलंदाजांवर पूर्णतः विसंबून होतो, परंतु रविवारचा दिवस आमचा नव्हता, तयार केलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करू शकलो नाही, असे पाक कर्णधार सलमान आघाने सांगितले. आम्ही फलंदाजीतही कमी पडलो. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पॉवरप्लेममध्ये तीन किंवा चार विकेट गमावणे याचा फटका बसतो. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही फलंदाजी करणे सोपे नव्हते, असे सलमान म्हणाला.