South Africa Women vs England Women: महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका महिला संघाने प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड महिला संघाचा 6 धावांनी पराभव केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर 165 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 20 षटकात 8 बाद 158 धावा केल्या.
इंग्लंडकडून सलामीला खेळायला आलेल्या डॅनिएल वॅट आणि सोफिया डन्कली यांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र शबनम ईस्माइलने 6 व्या षटकात इंग्लंडला दुहेरी धक्के दिले. तिने डन्कलीला 28 धावांवर आणि एलिस कॅप्सीला शुन्यावर बाद केले. त्यानंतर वॅटही 34 धावांवर बाद झाली.
पण नंतर नतालिया स्किव्हर आणि कर्णधार हिदर नाईटने डाव संभाळला होता. या दोघींनी संघाला विजय मिळवून देण्याचाही प्रयत्न केला. पण 17 व्या षटकात नादिन डी क्लर्कने स्किव्हरला 40 धावांवर बाद केले.
त्यानंतर 18 व्या षटकात अयाबोंगा खाकाने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे इंग्लंडचा संघ संकटात सापडला. तरी नाईट खेळपट्टीवर असल्याने इंग्लंडच्या आशा जिवंत होत्या. इंग्लंडला अखेरच्या षटकात 13 धावांची गरज होती. पण शबनमने शानदार गोलंदाजी करताना नाईटला तिसऱ्या चेंडूवर 31 धावांवर त्रिफळाचीत केले. या षटकात तिने इंग्लंडला केवळ 6 धावाच घेऊन दिल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 6 धावांनी विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेकडून आयाबोंगा खाकाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच शबनम ईस्माइलने 3 विकेट्स घेतल्या, तर नादिन डी क्लर्कने एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून सलामी जोडीने दमदार कामगिरी केली. ताझमिन ब्रिट्स आणि लॉरा वोल्वार्ड यांनी सलामीला 96 धावांची भागीदारी केली. त्यांची दमदार भागीदारी 14 व्या षटकात वोल्वार्ड बाद झाल्याने तुटली. 44 चेंडूत 53 धावांची खेळी केलेल्या वोल्वार्डला सोफी एक्लेस्टोनने बाद केले.
पण त्यानंतरही ब्रिट्सने आपली चांगली लय कायम ठेवली होती. अखेर ती 55 चेंडूत 68 धावा करून 18 व्या षटकात बाद झाली. पण तिने दुसऱ्या विकेटसाठी मॅरिझेन केपबरोबर 46 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 140 धावांचा टप्पा सहज पार केला. होता. पण त्यानंतर क्लो ट्रायॉन (3) आणि नादिन डी क्लर्क (0) 19 व्या षटकात स्वस्तात बाद झाल्या.
मात्र केपने दक्षिण आफ्रिका 160 धावांचा टप्पा पार करेल याची काळजी घेतली. ती 20 व्या षटकानंतर 13 चेंडूत 27 धावांवर नाबाद राहिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 4 बाद 164 धावा उभारल्या.
इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच लॉरेन बेलने 1 विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार अंतिम सामना
दरम्यान, आता दक्षिण आफ्रिका महिला संघाचा या स्पर्धेतील अंतिम सामना 5 वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामन्यात भारतीय महिला संघाला 5 धावांनी पराभूत करत तब्बल सातव्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात होणारा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळणारा संघ टी20 वर्ल्डकप 2023 चे विजेतेपद पटकावेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.