Somalia sprinter Nasra Abukar Ali took more than 21 seconds to complete 100 metres race:
सोशल मीडियावर काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला धावपटू 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अत्यंत धीम्यागतीने धावताना दिसत आहे. दरम्यान, आता याच घटनेबद्दल मोठी बातमी समोर येत आहे.
ही धावपटू सोमालिया देशाची असून तिचे नाव नासरा अबुकार अली असे नाव आहे. या घटनेनंतर देशाच्या ऍथलेटिक फेडरेशनच्या अध्यक्षा खादिजो अदेन दाहीर यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबद्दल सोमालियाचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री मोहम्मद बर्रे मोहमुद यांनी माहिती दिली आहे.
20 वर्षीय नासरा अबुकार अली ही चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्स स्पर्धेत 100 मीटर धावण्याचया शर्यतीत सहभागी झाली होती. या शर्यतीत ती सर्वात शेवट आली. तिला ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 21.81 वेळ लागला. हा 100 मीटर शर्यतीत लागलेला सर्वाधिक वेळ ठरला.
विशेष म्हणजे या स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर आलेल्या धावपटूपेक्षा तिला तब्बल 10 सेकंद जास्त वेळ लागला. पहिल्या क्रमांकावरील धावपटूने 11.58 सेकंदात शर्यत पूर्ण केली होती. तसेच नासराचे सर्व प्रतिस्पर्धी धावपटू फिनिश लाईनपर्यंत पोहचले, तेव्हा ती त्या फ्रेममध्येही कुठेच नव्हती. या शर्यतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला.
या घटनेनंतर सोमालियाच्या क्रीडामंत्र्यांनी म्हटले आहे की सोमालियाच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबर चौकशी करण्यात आली, ज्यातून असे आढळले की नासरा ही धावपटूही नाही आणि तिला खेळाची कोणतीही पार्श्वभूमीही नाही.
क्रीडामंत्र्यांनी एका निवेदनात असेही सांगितले आहे की 'सोमाली ऍथलेटीक्स फेडरेशनच्या अध्यक्षा खादिजो अदेन दाहीर यांनी सत्तेचा गैरवापर, घराणेशाही आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाचे नाव बदनाम करण्याच्या घटनांमध्ये गुंतलेले आहे.'
'जे निष्कर्ष समोर आले आहे, त्याआधारे सोमालिया राष्ट्रीय ऑलिम्पिक्स कमिटीने खादिजो अदेन दाहीर यांना निलंबित करायला हवे. याशिवाय मंत्रालय सोमालियाच्या ऍथलेटिक फेडरेशनच्या अध्यक्षा आणि सोमाली विद्यापीठ क्रीडा संघटनेच्या खोटेपणासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा हेतू ठामपणे पुढे मांडत आहे.'
मंत्रालयाने अशीही माहिती दिली की चौकशीदरम्यान हे देखील लक्षात आले आहे की सोमाली युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स असोसिएशनची कोणतीही अधिकृत नोंदणी नाही.
दरम्यान, क्रीडामंत्र्यांनी या घटनेबद्दल सर्वांची जाहीर माफी मागितली असून त्यांच्या मंत्रालयाला माहित नव्हते की नासरा या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.