Shubman Gill: आशिया कप 2023 मध्ये भारताने नेपाळविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात भारताने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला. नेपाळला पराभूत करुन भारताने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे.
एवढेच नाही तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल पुन्हा त्यांच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसले, ज्याची अपेक्षा होती आणि ज्यासाठी हे दोन्ही खेळाडू ओळखले जातात. शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खूप संथपणे खेळताना दिसला होता.
दरम्यान, दोन्ही खेळाडूंनी नेपाळविरुद्ध अर्धशतके पूर्ण केली आणि यासह शुभमन गिलने एक नवा टप्पाही गाठला. त्याने जगातील अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.
त्यात दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या नावाचाही समावेश आहे.
खरे तर, शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1500 धावाही पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सर्वात जलद 1500 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. इतक्या धावा करण्यासाठी त्याने 29 सामने खेळले आहेत.
याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता, ज्याने 30 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तर रायन टेन डोशेट आणि जॉर्ज बेली यांनी 32 सामन्यांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या होत्या.
बाबर आझमलाही (Babar Azam) इथपर्यंत पोहोचण्यासाठी 32 सामने खेळावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डुसेननेही एवढ्याच सामन्यांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या होत्या. आता या बाबतीत शुभमन गिल नंबर वन झाला आहे.
शुभमन गिलने 62 चेंडूत 67 धावांची शानदार खेळी खेळली. त्याने आठ चौकार आणि एक षटकार मारला. यामुळेच शुभमन गिलला आयसीसी वनडे क्रमवारीतही चांगले स्थान मिळाले आहे.
बाबर आझम आज भलेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज असेल, पण शुभमन गिलही सातत्याने चांगली कामगिरी करत नंबर वनच्या दिशेने वाटचाल करत आहे. बाबर आझमचे रेटिंग 877 आहे. तर शुभमन गिलचे सध्याचे रेटिंग 743 आहे.
दरम्यान, नवीन रॅकिंग कधी जाहीर होणार, या खेळीचा त्याच्या रेटिंगवर किती परिणाम होतो, हे पाहावे लागेल. आता पुढच्या सामन्यात शुभमन गिल पुन्हा पाकिस्तानशी (Pakistan) भिडणार आहे, जेव्हा दोन्ही संघ आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये 10 सप्टेंबरला भिडतील.
पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मात्र, पुढचा सामना पूर्ण खेळला जाईल, अशी अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.