India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा सामना रविवारी झाला. तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलने शतकी खेळी केली. याबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे.
23 वर्षीय गिलने 97 चेंडूत 116 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले. याबरोबर तो वयाच्या 23 व्या वर्षापर्यंत श्रीलंकेविरुद्ध वनडे शतक करणारा मास्टर-ब्लास्टर सचिननंतर दुसराच भारतीय सलामीवीर ठरला आहे.
सचिननेही 9 एप्रिल 1995 रोजी श्रीलंकेविरुद्ध वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी सलामीला 112 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. ही श्रीलंकेविरुद्ध केलेली सचिनची पहिली वनडे शतकी खेळी देखील होती.
दरम्यान, गिलचे हे कारकिर्दीतील दुसरेच वनडे शतक आहे. त्याचबरोबर तो पहिल्या 20 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. त्याने या यादीत 18 डावातच विराट कोहलीला मागे टाकले आहे. गिलने 18 डावात वनडेमध्ये 894 धावा केल्या आहेत. विराटने त्याच्या पहिल्या 20 वनडे डावात 847 धावा केल्या होत्या.
पहिल्या 20 वनडे डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज -
894 धावा - शुभमन गिल (18 डाव)
847 धावा - विराट कोहली
822 धावा - नवज्योत सिंग सिद्धू
813 धावा - श्रेयस अय्यर
783 धावा - शिखर धवन
शुभमनची रोहित-विराटबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी प्रथमदर्शनी योग्य ठरवला.
शुभमन आणि रोहित यांनी 95 धावांची भागीदारी केली. तसेच रोहित 42 धावांवर बाद झाल्यानंतर शुभमनला विराट कोहलीने चांगली साथ दिली. शुभमन आणि विराट यांनी 131 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने 31 षटकातच 200 धावांचा टप्पा पार केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.