Shoaib Akhtar On Imran Khan: पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पंजाब प्रांतातील वजीराबाद येथे हल्ला झाला असून त्यात ते जखमी झाले आहेत. यामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. इम्रान खान यांच्यावर हा हल्ला आझादी मार्चदरम्यान झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. इम्रान खान यांच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने वक्तव्य केले आहे.
शोएब अख्तरने हे वक्तव्य केले
इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर शोएब अख्तर म्हणाला की, 'इम्रान भाईवर झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकले. ते आता बरे आहेत आणि अल्लाह त्यांना सुरक्षित ठेवो. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हे कृत्य कोणी केले असेल, पण देशात या गोष्टी थांबल्या पाहिजेत. अल्लाह आपल्या देशाचे रक्षण करो. सगळा ड्रामा थांबला पाहिजे, काही निष्कर्षापर्यंत पोहोचले पाहिजे.'
रॅली दरम्यान गोळीबार
इम्रान खान (Imran Khan) पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील वजीराबाद भागात मोर्चा काढत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामुळे ते जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी जखमी झालेल्या त्यांच्या एका समर्थकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
1992 मध्ये विश्वचषक जिंकला
इम्रान खान यांची गणना जगातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्यांच्या नेतृत्वाखालीच पाकिस्तान संघाने 1992 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्यांनी तीन विवाह केले आहेत. ते पाकिस्तान तेहरीक इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी पाकिस्तानी संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले. इम्रान खान यांनी पाकिस्तानसाठी (Pakistan) 88 कसोटी सामन्यांमध्ये 362 विकेट आणि 3807 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी 175 एकदिवसीय सामन्यांमध्ये 182 विकेट आणि 3709 धावा केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.