Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty made a history: शनिवारी भारतीय बॅडमिंटनसाठी आनंदाची बातमी आली आहे. सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या युवा भारतीय जोडीने दुबईत सुरु असलेल्या बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
सात्विक आणि चिराग ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे, ज्यांनी बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. इतकेच नाही तर 1965 नंतर बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत खेळणारे ते पहिलेच भारतीय खेळाडूही ठरले आहेत.
शनिवारी उपांत्य फेरीत सात्विक आणि चिराग यांचा सामना ऑलिम्पिक विजेत्या तैवानच्या ली यांग आणि वँग ची-लीन यांच्या विरुद्ध झाला. पण वँग दुखापतग्रस्त झाल्याने तैवानच्या जोडीने माघार घेतली. त्यामुळे सात्विक आणि चिराग यांचा अंतिम सामन्यातील प्रवेश पक्का झाला.
उपांत्य सामन्यात भारतीय आणि तैवानच्या जोडीमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली होती. दोन्ही जोड्या एकमेकांवर आघाडी मिळवत होत्या. पण अखेरीत भारतीय जोडीने 21-18 अशा फरकाने पहिला सेट जिंकला होता.
दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला चिरागच्या घोट्याला वेदना झाल्या, पण त्याने पेन-रिलीफ स्प्रे मारत पुन्हा खेळ सुरू केला. दरम्यान 13-14 असे दुसऱ्या सेटमध्ये गुण झालेले असताना वँगच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे तैवानच्या जोडीला हा सामना अर्ध्यातूनच सोडावा लागला. त्यामुळे सात्विक आणि चिराग यांना अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला.
आता रविवारी सात्विक आणि चिराग यांना मलेशियाच्या ओंग यू सिन आणि तियो ए यी या जोडीविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. या अंतिम सामन्यात विजय मिळवून या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जोडी होण्याची चिराग आणि सात्विक यांना संधी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.