IND vs ENG: पदार्पणातच सर्फराजचं नाणं खणखणीत वाजलं, दोन अर्धशतकांसह मिळवलं गावसकरांच्या पंक्तीत स्थान

Sarfaraz Khan Debut Record: सर्फराजने कसोटी पदार्पणात दोन अर्धशतकं करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Sarfaraz Khan Debut
Sarfaraz Khan DebutANI

India vs England, 3rd Test at Rajkot, Sarfaraz Khan Record:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने तब्बल 434 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यातून मुंबईचा 26 वर्षीय फलंदाज सर्फराज खानने भारतकडून कसोटी पदार्पण केले आहे. या पदार्पणाच्या सामन्यात त्याने एका खास विक्रमालाही गवसणी घातली आहे.

या सामन्यात सर्फराजने पहिल्या डावात 66 चेंडूत 62 धावांची खेळी केली होती. या डावात तो धावबाद झाला होता. तसेच दुसऱ्या डावातही फलंदाजी करताना त्याने शानदार खेळ केला. त्याने दुसऱ्या डावात 72 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली.

Sarfaraz Khan Debut
IND vs ENG, Video: 'ही मोठ्या करियरची सुरुवात...', कुंबळे-कार्तिकच्या शब्दांनी पदार्पणवीर सर्फराज-जुरेलला बळ

त्यामुळे सर्फराज पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा भारताचा चौथाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी दिलावर हुसैन, सुनील गावसकर आणि श्रेयस अय्यर यांनी असा कारनामा केला आहे.

दिलावर हुसैन यांनी 1934 साली इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे भारताकडून कसोटी पदार्पण करताना पहिल्या डावात 59 आणि 57 धावांची खेळी केली होती.

तसेच सुनील गावसकरांनी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये 1971 साली वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करताना पहिल्या डावाच 65 आणि दुसऱ्या डावात नाबाद 67 धावांची खेळी केली होती.

त्याचबरोबर श्रेयस अय्यरने कानपूरला 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करताना पहिल्या डावात 105 धावा आणि दुसऱ्या डावात 65 धावांची खेळी केली होती.

दरम्यान, सर्फराज भारताकडून कसोटी पदार्पण करणारा 311 वा खेळाडू आहे. त्याला त्याच्या पदार्पणाची कॅप भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या हस्ते सामन्यापूर्वी देण्यात आली.

Sarfaraz Khan Debut
IND vs ENG: रोहितनंतर जडेजाच्या शतकी खेळीनं राजकोट गाजलं; अश्विन अन् कपिल देव यांच्या यादीत समावेश

सामन्यात भारताचा विजय

या सामन्यात चौथ्या दिवशी सर्फराजने यशस्वी जयस्वालबरोबर नाबाद 172 धावांची भागीदारीही केली. जयस्वालने आक्रमक खेळताना भारताच्या दुसऱ्या डावात नाबाद 214 धावांची खेळी केली. या डावात जयस्वालचे द्विशतक आणि सर्फराजचे अर्धशतक झाल्यानंतर भारताचा डाव 98 षटकात 4 बाद 430 धावांवर घोषित करण्यात आला.

या सामन्यात पहिल्या डावात घेतलेल्या 126 धावांच्या आघाडीमुळे भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 39.4 षटकात 122 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात पहिल्या डावात भारताने 130.5 षटकात सर्वबाद 445 धावा केल्या होत्या. तसेच इंग्लंडचा पहिला डाव 71.1 षटकात 319 धावांवर संपला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com