Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे सध्या चर्चेत आला आहे. गुरुवारी समोर आलेल्या एका व्हिडिओतून तो एका वादात अडकताना दिसला. आता असे समोर आले आहे की सेल्फीवरून त्याच्याबरोबर झालेल्या वादानंतर सपना गिल या महिलेला अटक झाली आहे.
झाले असे की पृथ्वी शॉने सेल्फी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या कारवर काही लोकांनी हल्ला केला होता. या प्रकरणात मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये सपना गिलसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सपना गिलला अटक करण्यात आल्याचे समजले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, अनेक रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी माहिती दिली आहे की बुधवारी पाहाटे सहारा हॉटेलजवळ ही घटना घडली. या हॉटेलमध्ये शॉसह त्याचे मित्र आशिष सुरेंद्र यादव आणि ब्रिजेश आले होते. त्यावेळी दोन व्यक्तींनी त्याच्याकडे सेल्फीची मागणी केली. सुरुवातीला शॉ याने त्यांना सेल्फी दिली. मात्र त्यानंतर त्यांनी सातत्याने त्याला फोटोसाठी त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शॉ याने हॉटेल मॅनेजरकडे त्यांची तक्रार केली. मॅनेजरने त्या लोकांना बाहेर काढले.
तसेच आशिषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते लोक हॉटेलबाहेर शॉची वाट पाहात थांबले होते. त्यांनी नंतर शॉ याच्या कारची पुढची काच बेसबॉल बॅटने फोडली. तसेच हे प्रकरण हिंसक वळण घेत असल्याचे लक्षात येताच आशिषने शॉला दुसऱ्या कारने पाठवले. तसेच नंतर आशिष आणि ब्रिजेशही तेथून निघाले.
मात्र, काही लोकांच्या ग्रुपने त्यांचा पाठलाग केला. तसेच तक्रारीनुसार या ग्रुपने त्यांची कार थांबवल्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, तसेच खोटी तक्रार करण्याची धमकी दिली.
तसेच रिपोर्ट्सनुसार असेही समोर आले आहे की सपना गिल हिने पोलिसांना कॉलही केला होता. मात्र, पोलिस घटनास्थळी आल्यानंतर तिने हे प्रकरण मिटले असल्याचे सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणात शॉवर हल्ला करणाचा आरोप असलेल्या लोकांपैकी आत्तापर्यंत शोबित ठाकूर आणि सपना गिल ही दोनच नावे समोर आली आहेत.
दरम्यान, गुरुवारी जे व्हिडिओ समोर आले होते त्यात पृथ्वी शॉ आणि एका महिलेमध्ये झटापट होताना दिसत असून महिलेच्या हातात बेसबॉल बॅट दिसत आहे. तसेच एका व्हिडिओमध्ये एक महिला पृथ्वी शॉवर आरोप करताना दिसत असून तिच्याबरोबर असलेला एक व्यक्ती शॉ विरुद्ध पुरावा असल्याचा दावा करत आहे.
तसेच सपना गिल हिच्या अटकेनंतर तिचे वकिल अली काशिफ खान देशमुख यांनी तिच्यावरील आरोप फेटाळले असून त्यांनी सांगितले आहे की पृथ्वी शॉ आणि त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तींनी सपना गिल आणि तिच्या मित्राला मारहाण केली. तसेच शॉ यानेच त्याच्या कारमधून बॅट काढली, ज्यानंतर बचाव करत असताना त्याच्याच कारची काच फुटली.
पण, अद्याप या प्रकरणातील पूर्ण सत्य समोर आलेले नाही.
कोण आहे सपना गिल?
सपना गिल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून तिला इंस्टाग्रामवर 2,19,000 फॉलोवर्स आहेत. तिने काही भोजपूरी सिनेमांमध्येही काम केले आहे. ती मुळची चंदीगढ़ची असून मुंबईत राहाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.