IPL Auction 2023: अवघ्या 30 मिनिटांचा खेळ अन् 'ऑलराऊंडर' ठरले आयपीएल लिलावाचे 'रेकॉर्डब्रेकर'

तीन अष्टपैलू क्रिकेटपटूंवर आयपीएल लिलाव 2023 मध्ये सर्वाधिक किंमतीची बोली लागली आहे.
IPL Auction 2023
IPL Auction 2023Dainik Gomantak

IPL Auction 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामाचा लिलाव शुक्रवारी कोचीमध्ये पार पडला. या लिलावात अनेक विक्रम मोडले गेले आहेत. हा लिलाव सुरू होण्यापूर्वीच अष्टपैलू खेळाडूंना मोठी बोली लागेल अशी चर्चा होती. ही चर्चा अखेर लिलावात खरी ठरल्याचे दिसले आहे. अष्टपैलू खेळाडूंना या लिलावात विक्रमी बोली लागल्या आहेत.

या लिलावात जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंचा लिलाव सुरू झाला, तेव्हा जवळपास सर्वच फ्रँचायझी सज्ज झाल्या. अष्टपैलू खेळाडूंना संघात सामील करून घेण्यासाठी सर्वच फ्रँचायझींमध्ये मोठी चूरस होती. त्यातच सुरुवातीलाच सॅम करनच्या बोलीने इतिहास घडवला.

(Sam Curran, Cameron Green and Ben Stokes are most expensive buys respectively in IPL Auction)

सॅम करनसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्याच चांगलीच चुरस लागली होती. 15 कोटींच्यावर किंमत गेली, तरी या दोन्ही संघांमध्ये त्याच्यासाठी मागली होती. मात्र अखेर पंजाब किंग्सने बाजी मारली आणि सॅम करनसाठी 18.50 कोटी रुपये मोजले. त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

त्याच्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनचे नाव आले होते. त्याच्यासाठीही सर्वच संघांमध्ये स्पर्धा होती. त्यातही मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांनी त्याला सर्वाधिक पसंती दाखवली होती.

पण मुंबई इंडियन्सने त्याची बोली जिंकली आणि त्याला 17.50 कोटी रुपयांना खरेदी केले. त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सॅम करन पाठोपाठ दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

या लिलावातील तिसरी सर्वात मोठी बोली लागली ती इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला. त्याच्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद असे अनेक संघ उत्सुक होते.

पण चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यासाठी सर्वाधिक 16.25 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. स्टोक्स आयपीएल लिलावाच्या इतिहासातील संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्यासह ख्रिस मॉरिसही तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला आयपीएल 2021 लिलावात 16.25 कोटींची बोली लागली होती.

विशेष गोष्ट अशी की सॅम करन, कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांच्यावर केवळ अर्धातासात विक्रमी बोली लागल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com