Sakshi Malik reveals Truth Behind resuming work in Railways: गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये भारतीय कुस्तीपटूंचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंगविरुद्ध आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सध्या प्रचंड चर्चेत आहे.
दरम्यान, सोमवारी असे वृत्त समोर आले होते की साक्षी मलिकने या आंदोलनातून माघार घेतली आहे. पण आता खुद्द साक्षीनेच याबद्दल खुलासा केला आहे.
सोमवारी अशी चर्चा होती की ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी कुस्तीपटूंच्या आंदोलनातून वेगळी झाली असून ती रेल्वेमध्ये तिची नोकरी करण्यासाठी परतली आहे. पण आता तिनेच ट्वीट करत सर्व घटनेबद्दल सत्य सांगितले आहे. तिने स्पष्ट केले आहे की तिने या आंदोलनातून माघार घेतलेली नाही.
एका चॅनेलने दिलेल्या तिच्या माघारीबद्दल आणि रेल्वेत नोकरीसाठी पुन्हा रुजू झाल्याबद्दलच्या बातमीचा फोटो तिने शेअर केला आहे.
तसेच तिने लिहिले की 'ही बातमी चूकीची आहे. न्यायाच्या युद्धात आमच्यापैकी कोणीही मागे हटलेले नाही आणि आम्ही हटणारही नाही. सत्याग्रहाबरोबरच मी रेल्वेमध्ये माझी जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरू राहाणार आहे. कृपया कोणतीही चूकीची बातमी चालवू नका.'
हे ट्वीट करत साक्षीने ती जरी रल्वेत पुन्हा नोकरीसाठी रुजू झाली असली तरी आंदोलनातून माघार घेतलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या आंदोलनात साक्षीबरोबर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे स्टार कुस्तीपटूही सहभागी झालेले आहेत. या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैगिंक छळ केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, बजरंग पुनिया देखील त्याच्या रेल्वेतील नोकरीमध्ये पुन्हा रुजू झाला आहे. त्यामुळे तो या आंदोलानातून माघार घेणार का अशीही चर्चा होत होती. पण त्यानेही ट्वीट करत तो माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याने लिहिले आहे की 'आंदोलनातून माघार घेण्याच्या बातम्या खोट्या आहेत. या बातम्या आम्हाला नुकसान पोहचवण्याच्या दृष्टीने पसरवल्या जात आहेत. आम्ही मागे हटलेलो नाही आणि आम्ही आंदोलनही मागे घेतलेले नाही. महिला कुस्तीपटूने एफआयआर मागे घेतल्याची बातमीही खोटी आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरू असेल.'
दरम्यान, काही दिवसांपूर्वी असे समोर आले होते की ब्रीजभूषण विरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत. पहिल्या एफआयआरमध्ये सहा ऑलिम्पियन्स खेळाडूंच्या आरोपांचा उल्लेख आहे, तर दुसऱ्या एफआयआरमध्ये अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लावलेल्या आरोपांचा उल्लेख आहे. एफआयआरमध्ये कुस्तीपटूंनी ब्रीजभूषण विरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आरोप केला आहे.
या आंदोलनाबाबत कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. 28 मे रोजी जंतरमंतर ते नवीन संसदेपर्यंत पदयात्रेदरम्यान आंदोलनकर्ते कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच कुस्तीपटूंवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर कुस्तीपटूंनी तीव्र भूमिका स्विकारत 30 मे रोजी गंगेच्या प्रवाहात त्यांची पदके विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय शेतकरी संघाचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना 5 दिवसांची वाट पाहाण्याची विनंती केली होती. त्यानंतर अमित शाह यांच्याशी शनिवारी अंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी भेट घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.