IND vs SA Test Series: भारतीय संघाचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. निवड समितीने आता त्याच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेकेबरहा येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना ऋतुराजच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याचे स्कॅनिंग करण्यात आले, त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला उर्वरित दौऱ्यातून वगळले होते.
दरम्यान, अभिमन्यू ईश्वरन हा टॉप ऑर्डरचा फलंदाज असून तो मागील काही काळापासून भारतीय संघाकडून खेळण्याची वाट पाहत होता. तो भारतीय A संघाचा हिस्सा राहिला आहे. त्याने 88 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 47.24 च्या सरासरीने 6567 धावा केल्या आहेत. वेगवान गोलंदाज हर्षित राणाही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे 26 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका A विरुद्धच्या चार दिवसीय सामन्यातून बाहेर पडला. निवड समितीने भारतीय A संघात आता रजत पाटीदार, सर्फराज खान, आवेश खान आणि रिंकू सिंह यांचाही समावेश केला, मात्र कुलदीप यादवला संघातून वगळण्यात आले.
दुसरीकडे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरु होत आहे. पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियनमध्ये खेळवला जाईल. तर दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे 3 ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली, तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत ऋतुराजने शानदार कामगिरी केली होती. मात्र, एकदिवसीय मालिकेत तो म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 5 आणि 4 धावा करुन ऋतुराज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.