IND vs BAN: बांगलादेश दौऱ्यात भारतीय संघाला पहिल्याच वनडे सामन्यात यजमानांविरुद्ध एका विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. भारताला या सामन्यात काही झेल सोडण्याचाही फटका बसला. दरम्यान, भारतीय क्षेत्ररक्षकांकडून झेल सुटल्याने कर्णधार रोहित शर्माही वैतागलेला दिसला.
या सामन्यात भारताने बांगलादेशला 187 धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने 136 धावांतच 9 विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असे अनेकांना वाटत होते. मात्र, अखेरच्या विकेटसाठी मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिजूर रहेमान यांनी नाबाद 51 धावांची भागीदारी केली आणि बांगलादेशला विजय मिळवून दिला.
दरम्यान, भारताने (Team India) मेहदी हसन आणि मुस्तफिजूर यांची भागीदारी तोडण्याच्या मिळालेल्या संधीही गमावल्याचे दिसले. 43 व्या षटकात सलग दोन चेंडूवर स्थिरावलेल्या मेहदी हसनला बाद करण्याची भारताकडे संधी होती. मात्र, दोन्ही चेंडूवर त्याचा झेल सुटला.
शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत असलेल्या 43 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन फटका मारायला चूकला होता. तो चेंडू त्याच्या बॅटची वरची कड घेऊन उंच उडावा होता. त्यावेळी यष्टीरक्षक केएल राहुलने (KL Rahul) तो झेल घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून हा झेल सुटला.
त्याच्या पुढच्याच चेंडूवर स्टेडियममधील लाईट्समुळे चेंडूचा अंदाज घेण्यात वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) अपयशी ठरला आणि मेहदी हसनला पुन्हा जीवदान मिळाले.
पण, सलग दोन चेंडूवर दोन झेल सुटल्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र, चांगलाच चिडला. त्याने काही अपशब्दही वापरले. त्याच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव 41.2 षटकातच 186 धावांत संपुष्टात आला. भारताकडून केवळ केएल राहुलने 73 धावांची एकाकी झुंज दिली, तर बांगलादेशकडून शाकीब अल हसनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आणि इबादत हुसैनने 4 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 187 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या होत्या. केवळ लिटन दासने 41 धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केलेला.
पण, 40 षटकातच 9 विकेट्स गमावल्यानंतर बांगलादेशसाठी मेहदी हसनने मुस्तफिजूरला साथीला घेत संघाच्या विजयावर 46 व्या षटकात शिक्कामोर्तब केले. मेहदी हसनने नाबाद 38 आणि मुस्तफिजूरने नाबाद 10 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.