Rishabh Pant Car Accident: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी पहाटे कार अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असल्याचे समजले आहे. तो दिल्लीवरून रुडकीला जात असताना त्याचा हा अपघात झाला. दरम्यान त्याच्या अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
रिपोर्ट्सनुसार पंतच्या बीएमडब्ल्यू कारचा रुड़कीच्या नारसन बॉर्डरजवळ अपघात झाला. त्यावेळी स्वत: पंत कार चालवत होता. पण डुलका लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर त्याने विंड स्क्रिन तोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या कारला नंतर आग लागली आणि या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पण, यात पंतला वाचवण्यात यश आले आहे. अपघाताजवळील काही स्थानिकांनी त्याला लगेचच रुडकीच्या स्थानिक रुग्णालयात हलवले. तिथे त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
पंतला गरज पडल्यास दिल्लीलाही हलवण्यात येऊ शकते, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितले आहे. पंतला पाठीला, डोक्याला आणि पायाला दुखापती झाल्या असल्याचे समजले आहे.
पंत हा भारतीय क्रिकेट संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. लवकरच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाणार होता. मात्र, त्याआधीच हा अपघात झाल्याने आता त्याला पुढील बरेच महिने क्रिकेट मैदानापासून दूर राहावे लागणार आहे.
पंतने आत्तापर्यंत भारताकडून ३३ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५ शतकांसह 2271 धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३० वनडे सामने खेळले असून 865 धावा केल्या आहेत. पंतने ६६ आंतरराष्ट्रीय टी२० सामनेही खेळला आहेत. यामध्ये त्याने ९८७ धावा केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.