World Cup 2023: विराट, श्रेयस अन् शमी..., टीम इंडिया 12 वर्षांनी फायनलमध्ये पोहण्याची 5 कारणे

India vs New Zealand: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला वर्ल्डकप 2023 सेमीफायनलमध्ये पराभूत करत 12 वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश केला, या विजयामागील 5 कारणांचा घेतलेला आढावा.
Team India
Team IndiaBCCI
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs New Zealand Semi-Final:

भारतीय क्रिकेट संघाची वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची तब्बल 12 वर्षांची प्रतिक्षा संपली. भारताने बुधावारी (15 नोव्हेंबर) उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. यापूर्वी भारताने 2011 साली वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला होता.

बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 397 धावा केल्या होत्या. त्यानंतर 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 48.5 षटकात 327 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या या विजयामागील प्रमुख ५ कारणे कोणती राहिली, याचा आढावा घेऊ.

महत्त्वाची नाणेफेक जिंकली

ही खेळपट्टी फलंदाजीला मदत करणारी होती, त्यातच मुंबईतील उष्णतेचा विचार करता प्रथम फलंदाजी करणे महत्त्वाचे ठरणार होते. अशातच भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो भारतासाठी फायदेशीर सिद्ध झाला.

रोहित-गिलची सुरुवात

प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर एक बाजू युवा शुभमन गिल सांभाळत असताना दुसऱ्या बाजूने कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला होता. त्याने सुरुवातीलाच मोठे फटके मारत भारताला चांगली सुरुवात दिली. त्यांची जोडी ९ व्या षटकात रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावांवर बाद झाल्याने तुटली. पण तो बाद होईपर्यंत सलामीला रोहित आणि गिल यांनी 71 धावा जोडल्या होत्या.

Team India
World Cup 2023: श्रेयस अय्यरची करिष्माई खेळी; वर्ल्ड कपमधील सलग दुसरे शतक झळकावत मोडले अनेक रेकॉर्ड!

विराट, श्रेयस अन् गिलने पुन्हा सिद्ध केला आपला दर्जा

रोहित बाद झाल्यानंतर आक्रमक खेळण्याची जबाबदारी गिलने आपल्या खांद्यावर घेतली, तर त्याला दुसऱ्या बाजूने विराट कोहलीकडून साथ मिळाली. गिल आणि विराट यांच्यात 93 धावांची भागीदारी झालेली असतानाच गिलला मात्र उष्णतेचा त्रास झाल्याने क्रॅम्प्स आले, त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले, त्यावेळी तो 79 धावांवर खेळत होता.

तो बाहेर गेल्यानंतर श्रेयस अय्यरने विराटला साथ दिली. या दोघांची जोडी पुन्हा जमली आणि त्यांनी न्यूझीलंडला मोठे यश मिळणार नाही याकडे लक्ष दिले. त्यांनी खराब चेंडूंचा समाचार घेत तब्बल 163 धावांची भागीदारी केली.

या भागीदारीदरम्यान विराटने यंदाच्या वर्ल्डकपमधील तिसरे, तर वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक केले. पण विराट 117 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने टॉप गिअर टाकत तोडफोड फलंदाजी केली. त्याने तब्बल 8 षटकारांसह 105 धावांची शतकी खेळी केली.

रोहितच्या सुरुवातीच्या फटकेबाजीनंतर विराट, श्रेयस आणि गिलच्या खेळींमुळे भारताने तब्बल 397 धावांचा डोंगर उभा केला.

शमीची धारदार गोलंदाजी

भारताने दिलेल्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडनेही चांगली सुरुवात केली होती. मात्र, न्यूझीलंडच्या आणि विजयाच्या मधे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी उभा राहिला. त्याने आधी न्यूझीलंडचे सलामीवीर डेवॉन कॉनवे आणि रचिन रविंद्र यांना बाद केले.

त्यानंतर मात्र कर्णधार केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांची जोडी जमली होती. त्यातच शमीने विलियम्सनचा झेल सोडल्याने दबाव वाढला होता. मात्र, पुन्हा एकदा शमीच भारताच्या मदतीला आला आणि त्याने विलियम्सन आणि मिचेल यांची जोडी तोडली.

त्याने विलियम्सनला 33 व्या षटकात 67 धावांवर बाद केले. त्याच षटकात त्याने टॉम लॅथमला माघारी धाडले आणि भारताला सामन्यात पुन्हा आणले. विलियम्सन आणि मिचेल यांनी 181 धावांची भागीदारी केली केली होती.

पण, एकाच षटकात 2 विकेट्स गेल्याने न्यूझीलंडवरील दबाव वाढला. या दबावाचा फायदा घेत शमीने एकूण 7 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडची अखेरची विकेटही त्यानेच घेत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी नोंदवली.

Team India
Virat Kohli: इतिहास घडला! विराटने ठोकले 50 वे वनडे शतक, सचिनसमोरच मोडला विश्वविक्रम

बुमराह-कुलदीपचेही मोलाचे योगदान

खेळपट्टीकडून फारशी साथ नसतानाही शमी करत असलेल्या शानदार गोलंदाजीला अखेरच्या 10 षटकात जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्याकडून चांगली साथ मिळाली. अखेरच्या 10 षटकात 100 हून अधिक धावा न्यूझीलंडला हव्या असताना त्यांनी धावा रोखण्याचे काम केले.

ग्लेन फिलिप्स आणि मिचेल यांची 75 धावांची भागीदारीही बुमराहनेच तोडली. त्याने फिलिप्सला 41 धावेवर बाद केले, पाठोपाठ कुलदीपने मार्क चॅपमनला बाद करत न्यूझीलंडला मोठे धक्के दिले.

तसेच नंतर मोहम्मद सिराजने मिचेल सँटेनरलाही फारवेळ टिकू दिले नाही. अखेर शमीने अखेरच्या दोन विकेट्स घेत भारताचा विजय निश्चित केला. यात डॅरिल मिचेलच्या (134) विकेटचाही समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com