

Rashid Khan Reject Indian Citizenship: आयपीएल 2026 चा थरार सध्या देशभर सुरु असतानाच अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान याने एका खळबळजनक खुलाशामुळे क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले. आपल्याला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य देशांकडून नागरिकत्व स्वीकारण्याची आणि त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची ऑफर मिळाली होती, मात्र आपण ती नम्रपणे नाकारली, असे राशिदने स्पष्ट केले. राशिद खानच्या 'Rashid Khan: From Streets to Stardom' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्याने आपल्या या निर्णयामागील भावना व्यक्त केल्या.
राशिदने आपल्या पुस्तकात लिहिले की, ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही देशांनी त्याला त्यांच्या देशाचे नागरिकत्व देण्याची तयारी दर्शवली होती. पीटीआयच्या अहवालानुसार, राशिदने या पुस्तकात नमूद केले की, "जर मी माझ्या मातृभूमीसाठी, अफगाणिस्तानसाठी खेळू शकत नसेल, तर मी जगातील इतर कोणत्याही देशासाठी खेळणार नाही." अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थिती पाहता, राशिदला सुरक्षित आयुष्य आणि क्रिकेटमध्ये मोठे भविष्य मिळावे या हेतूने हे प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र, राशिदने आपल्या देशाप्रती असलेल्या निष्ठेला सर्वोच्च स्थान दिले.
भारताच्या (India) नागरिकत्वाबाबतचा अनुभव सांगताना राशिद म्हणाला की, एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने त्याला स्वतः भेटून हा प्रस्ताव दिला होता. त्या अधिकाऱ्याने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत राशिदला भारतात स्थायिक होण्याचा आणि भारतीय कागदपत्रांच्या आधारे क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता.
राशिदने सांगितले की, हे ऐकून तो सुरुवातीला अवाक झाला होता. त्याने हसून त्या अधिकाऱ्याचे आभार मानले आणि स्पष्ट केले की, तो आपल्या देशासाठी खेळणेच पसंत करतो. अफगाणिस्तानच्या संघाने अनेक वर्षे भारतात राहून सराव केला आहे आणि भारताने त्यांना नेहमीच साथ दिली आहे, परंतु आपल्या देशाची जर्सी घालणे हे राशिदसाठी अभिमानास्पद असल्याचे त्याने या पुस्तकातून जगाला सांगितले.
सध्या राशिद खान (Rashid Khan) आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्स (GT) संघाकडून खेळताना दिसत आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत 5 सामन्यांत 6 बळी घेत आपल्या फिरकीची जादू कायम ठेवली आहे. गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात चॅम्पियन बनवण्यात राशिदचा मोलाचा वाटा होता आणि यंदाही तो आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. मैदानावरील त्याच्या कामगिरीसोबतच आता त्याच्या या देशभक्तीच्या खुलाशामुळे भारतीय चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.