Ranji Trophy Final: अय्यरचं शतक 5 धावांनं हुकलं, पण मुशीरनं 136 धावांसह मैदान जिंकलं; रोहित-सचिनचीही वानखेडेवर उपस्थिती

Mumbai vs Vidarbha : रणजी ट्रॉफी 2024 च्या अंतिम सामन्यात मुशीर खानने शतकी खेळी केली आहे, तर श्रेयस अय्यरचे शतक मात्र अवघ्या 5 धावांनी हुकले.
Musheer Khan | Shreyas Iyer | Ranji Trophy Final 2023-24 | Mumbai vs Vidarbha
Musheer Khan | Shreyas Iyer | Ranji Trophy Final 2023-24 | Mumbai vs VidarbhaPTI

Ranji Trophy 2023-24 Final, Mumbai vs Vidarbha

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारपासून (10 मार्च) मुंबई विरुद्ध विदर्भ संघात सुरू झाला आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात यजमान मुंबईच्या फलंदाजांनी तिसऱ्या दिवसापर्यंत तरी दबदबा राखल्याचे दिसले आहे.

दरम्यान, या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (12 मार्च) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

तिसऱ्या दिवशी मुंबईच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे 73 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर मुशीर खान आणि श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. अदित्य ठाकरेने बाद केल्याने त्यांची जोडी तुटली.

अदित्यने 102 व्या षटकात टाकलेल्या चेंडूवर श्रेयसने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे टायमिंग योग्य बसले नाही आणि त्यामुळे लाँग ऑफला असलेल्या क्षेत्ररक्षकाने त्याचा झेल घेतला. या शॉटदरम्यान श्रेयसची हातातली बॅटही सटकली.

दरम्यान, यामुळे त्याचे शतक मात्र अवघ्या 5 धावांनी हुकले. श्रेयसने 111 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 95 धावा केल्या.

दरम्यान, श्रेयस प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करताना दिसला आहे. त्याला इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतरही भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो मुंबईकडून रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात आणि आता अंतिम सामन्यात खेळला.

मात्र मुंबईने तमिळनाडूविरुद्ध एका डावाने जिंकलेल्या उपांत्य सामन्यातही तो ३ धावाच करू शकला होता. तसेच अंतिम सामन्याच्या पहिल्या डावातही त्याने 7 धावाच केल्या. परंतु, त्याने आता दुसऱ्या डावात 95 धावा करत टीकाकारांना उत्तर दिले आहे.

मुशीरचाही रणजी ट्रॉफीमध्ये जलवा

मुशीरने श्रेयसबरोबर 168 धावांची भागीदारी करताना त्याचे शतकही पूर्ण केले. परंतु त्याला 110 व्या षटकात हर्ष दुबेने बाद केले. त्याने 326 चेंडूत 10 चौकारांसह 136 धावा केल्या. दरम्यान सर्फराज खानचा धाकटा भाऊ असलेल्या मुशीर सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे.

त्याने मुंबईकडून रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याविरुद्ध 203 धावांची नाबाद द्विशतकी खेळी केली होती. तसेच उपांत्य सामन्यात तमिळनाडूविरुद्ध 55 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

तो त्याआधी 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेतही चांगला खेळला होता. त्याने या स्पर्धेत 2 शतके झळकावली होती.

मुंबईचा सामन्यात दबदबा

रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईचा दुसरा डाव 130.2 षटकात 418 धावांवर संपुष्टात आला. मुंबईकडून मुशीर, श्रेयस आणि कर्णधार रहाणे व्यतिरिक्त अष्टपैलू शम्स मुलानीनेही 50 धावांची शानदार खेळी केली.

विदर्भाकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना हर्ष दुबेने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर यश ठाकूरने 3 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, मुंबईने पहिल्या डावात 119 धावांची आघाडी घेतलेली असल्याने विदर्भासमोर विजयासाठी 538 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाने तिसऱ्या दिवस अखेर 2 षटकात बिनबाद 10 धावा केल्या असून अद्याप त्यांना 528 धावांची गरज आहे.

या सामन्यात पहिल्या डावात मुंबईने 64.2 षटकात सर्वाबाद 224 धावा केल्या होत्या. तसेच विदर्भाचा पहिला डाव मात्र 45.3 षटकात अवघ्या 105 धावांत उरकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com