

किशोर पेटकर
पणजी: आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो व विंडसर्फर कात्या कुएल्हो यांच्या कामगिरीवर गोव्याचे लक्ष असेल. त्यांनी पदके जिंकल्यास ती बाब राज्यासाठी ऐतिहासिक ठरेल.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तनिशा क्रास्टो (बॅडमिंटन) व व्हिन्सी बार्रेटो (पुरुष फुटबॉल) हे दोन गोमंतकीय क्रीडापटू भारतीय संघाचे सदस्य होते. आता येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमधील आइची-नागोया येथे होणाऱ्या स्पर्धेत पुन्हा गोव्याचे दोन खेळाडू भारतीय पथकात आहेत. पुरुष विंडसर्फर डेन कुएल्हो याच्यासाठी अंधूक संधी प्रत्यक्षात आल्यास राज्यातील क्रीडापटूंची संख्या तीन होईल. विंडसर्फिंग राष्ट्रीय चाचणीत अव्वल ठरूनही आवश्यक निकष पूर्ण न झाल्यामुळे त्याला जपानला जाणाऱ्या भारतीय पथकात स्थान मिळालेले नाही.
हॅटट्रिकची संधी थोडक्यात हुकली
कात्या दुसऱ्यांदा भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे. कात्या हिचा भाऊ डेन कुएल्हो याच्याबाबत फेरविचार झाल्यास कुएल्हो भांवडे पुन्हा एकदा एकत्रित देशातर्फे खेळतील. २०१८ मधील जाकार्ता-पालेमबांग आशियाई क्रीडा स्पर्धेत कात्या व डेन यांनी भाग घेतला होता. चाचणी सरस ठरूनही कात्या हिला २०२३ मध्ये झालेल्या २०२२ हांग् चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तांत्रिक कारणास्तव (केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मानांकन निकष) ऐनवेळी सहभाग हुकला होता. तेव्हा ती सहभागी झाली असती, तर २७ वर्षीय महिला आयक्यू-फॉईल विंडसर्फर सलग तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणारी पहिली गोमंतकीय क्रीडापटू ठरली असती.
तनिशाची लागोपाठ दुसरी स्पर्धा
गोमंतकीय पालक, पण दुबईत जन्मलेली २३ वर्षीय महिला बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो २०१७ पासून गोवा आणि भारताकडून खेळत आहे. यंदा सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेत आहे. चीनमधील हांग् चौऊ येथे झालेल्या तीन वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत तनिशा हिने महिला दुहेरीत अश्विनी पोन्नाप्पा हिच्या साथीत, तर के. साई प्रतीक याच्यासमवेत मिश्र दुहेरीत दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.
२०२४ मधील पॅरिस ऑलिंपिकमध्ये तनिशाने अश्विनी हिच्यासमवेत दुहेरीत भाग घेतला होता. यावेळेस लागोपाठ दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारी तनिशा गोव्याचा महान फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकरला गाठेल. गोलरक्षक ब्रह्मानंदचा १९८२ (नवी दिल्ली) व १९८६ (सोल) मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष फुटबॉल संघात समावेश होता
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.