FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 मध्ये मंगळवारी रात्री उशीरा पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड यांच्यात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात पोर्तुगालने 6-1 अशा गोल फरकाने एकतर्फी विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पोर्तुगालकडून युवा गोन्सालो रामोसने गोलची हॅट्रिक करत विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
लुसेल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात जेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डो ऐवजी रामोसला पोर्तुगालचे मॅनेजर फर्नांडो सँटोस यांनी संधी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण रामोसने मिळालेल्या संधीचे सोने केल्याने त्यांची ही चाल यशस्वी ठरली.
दरम्यान स्वित्झर्लंडने पोर्तुगालला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पण पोर्तुगालच्या सांघिक कामगिरीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पोर्तुगालने सामन्याच्या 17 व्या मिनिटालाच गोलचे खाते उघडले होते. रामोसने पोर्तुगालसाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर पेपने 33 व्या मिनिटाला पोर्तुगालची आघाडी 2-0 अशी वाढवली.
या गोलसह पेप वर्ल्डकपमध्ये गोल करणारा दुसऱ्या क्रमांकाचा वयस्कर खेळाडू ठरला. त्याने 39 वर्षे आणि 283 दिवस वय असताना हा गोल केला. या यादीत अव्वल क्रमांकावर रॉजर मिला आहे. त्यांनी रशिया विरुद्ध 1994 साली 42 वर्षे आणि 39 दिवस वय असताना गोल नोंदवला होता.
पहिल्या हाफनंतर पोर्तुगाल दोन गोलसह आघाडीवर होता. त्यानंतर दुसरा हाफ देखील रोमांचक ठरला. या हाफमध्ये दोन्ही संघांचे मिळून 5 गोल आले. रामोसने त्याचा दुसरा गोल 51 व्या मिनिटाला केला, तर त्याच्या 4 मिनिटानंतर लगेचच राफेल गुरेरोने पोर्तुगालसाठी चौथा गोल नोंदवला.
यानंतर स्वित्झर्लंडकडून 58 व्या मिनिटाला मॅन्यूएल अकान्जी याने पहिला गोल केला. पण तोपर्यंत पोर्तुगालने भक्कम आघाडी घेतलेली होती. त्यानंतर 67 व्या मिनिटाला रामोसने त्याची हॅट्रिक पूर्ण केली. ही फिफा वर्ल्डकप २०२२ मधील पहिली हॅट्रिक ठरली. तसेच भरपाई वेळेत सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या राफेल लिओने पोर्तुगालसाठी 6वा गोल नोंदवला आणि पोर्तुगाचा विजय निश्चित केला.
दरम्यान, रामोसच्या कामगिरीने पोर्तुगालला रोनाल्डोची कमी भासली नाही. तरी शेवटच्या काही मिनिटांचा खेळ राहिलेला असताना रोनाल्डो सबस्टिट्यूट म्हणून खेळायला आला, त्याने गोलही केला होता, पण तो ऑफसाईडला असल्याचा निर्णय देण्यात आला.
आता उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा सामना मोरोक्को विरुद्ध 10 डिसेंबर रोजी होणार आहे. मोरोक्कोने उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-0 असा पराभवाचा धक्का दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.