Portugal vs Uruguay: फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत सोमवारी रात्री ग्रुप एच मधील पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे सामना पार पडला. लुसेल स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पोर्तुगालने 2-0 अशा फरकाने विजय मिळवला. या विजयाबरोबरच पोर्तुगालने अंतिम 16 संघांमध्येही स्थान मिळवले आहे.
पोर्तुगालकडून ब्रुनो फर्नांडिसने दोन्ही गोल केले. या सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकही गोल दोन्ही संघांना करता आला नव्हता. पण पोर्तुगालने बऱ्यापैकी वर्चस्व ठेवले होते. दुसऱ्या हाफमध्ये मात्र पोर्तुगलाने वर्चस्व राखण्याबरोबरच गोल करण्यातही यश मिळवले.
सामन्याच्या 54 व्या मिनिटाला पोर्तुगालकडून फर्नांडिसने केलेल्या गोलने संघाला आघाडी मिळवून दिली. पण हा गोल काहीसा नाट्यपूर्ण ठरला. हा गोल ख्रिस्तियानो रोनाल्डोकडून (Cristiano Ronaldo) झाला, असे वाटले होते. मात्र फर्नांडिसने पास दिलेल्या चेंडूला रोनाल्डोचा स्पर्श झाला नव्हता. तो चेंडू थेट गोलपोस्टमध्ये गेला.
नंतर भरपाई वेळेत फर्नांडिसने दुसरा गोल करत पोर्तुगालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह आता पोर्तुगालचे 6 गुण झाले आहेत. त्यांच्यापूर्वी ब्राझील आणि फ्रान्स यांनी अंतिम 16 जणांच्या संघांमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता अजून 13 जागा बाकी आहेत.
तसेच बाद फेरीसाठी उरुग्वेचे आव्हान कायम आहे. पण त्यांना पुढे जाण्यासाठी आता घानाविरुद्ध विजय आवश्यक असणार आहे. पोर्तुगाल त्यांचा तिसरा साखळी सामना दक्षिण कोरियाविरुद्ध खेळणार असून ग्रुप एचमधील पुढील फेरीत जाणारा दुसरा संघ बनण्यासाठी उरुग्वे, घानाबरोबरच दक्षिण कोरिया देखील स्पर्धेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.