Virat Kohli and Gautam Gambhir Fight: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सामना झाला. हा सामना बेंगलोरने १८ धावांनी जिंकला. पण या सामन्यादरम्यान आणि नंतर विराट कोहली आणि लखनऊचे खेळाडू आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात झालेल्या वाद चर्चेचा विषय ठरला.
झाले असे की बेंगलोरने लखनऊसमोर १२७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करत असताना ७७ धावांवरच लखनऊने ८ विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर लखनऊकडून नवीन उल-हक आणि अमित मिश्रा फलंदाजी करत होते. त्याचदरम्यान बेंगलोरचा स्टार खेळाडू विराट तिथे क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या शाब्दिक वाद झाले.
यावेळी पंचांनी मध्यस्थी करत मिश्रा, नवीन आणि विराट यांच्यातील वाद सोडवले होते. पण नंतर सामना संपल्यानंतर दोन्ही संघ हात मिळवत असताना विराट आणि नवीन समोर आल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यांच्यातील वाद इतके वाढले की दोन्ही संघातील इतर खेळाडूंना त्यांना दूर करावे लागले.
याचदरम्यान लखनऊचा सलामीवीर काईल मेयर्सही विराटशी काहीतरी बोलला होता आणि त्यावेळी गंभीरही चिडलेला दिसला होता. काही क्षणात हा वाद पुन्हा मोठा झाला. त्यानंतर विराट आणि गंभीर पुन्हा एकमेकांवर चिडून मागे आले आणि त्यांच्यात वाद सुरू झाले.
यावेळी बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि लखनऊचा कर्णधार केएल राहुल मध्यस्थी करतानाही दिसले. तसेच नंतर विराट आणि गंभीरला अमित मिश्राने मध्यस्थी करत दूर केले. त्याला दोन्ही संघातील सदस्यांनीही त्यांना दूर नेण्यात मदत केली. या वादावर आता सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया उमटत असून काहींनी विराटवर, तर काहींनी गंभीरवर टिका केली आहे.
काही चाहत्यांनी विराटने गेल्या सामन्याचा बदला घेतला असल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे. याआधी आयपीएल २०२३ स्पर्धेत बेंगलोर आणि लखनऊ संघ 10 एप्रिलला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने आले होते. त्यावेळी लखनऊने शेवटच्या चेंडूवर १ विकेटने विजय मिळवला होता.
या विजयानंतर लखनऊच्या खेळाडूंनी आणि गंभीरने जोरदार सेलिब्रेशन केले होते. त्याचमुळे त्या पराभवाचा आणि सेलिब्रेशनचा बदला विराटने घेतला असल्याचे अनेक चाहत्यांनी म्हटले आहे. तसेच काही चाहत्यांनी म्हटले आहे की सोमवारी झालेल्या सामन्याच्या वादाची ठिणगी १० एप्रिलला झालेल्या सामन्यानंतरच पडली होती.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराट आणि गंभीर यांच्यात आयपीएलमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांच्यात मैदानात भांडणं झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
दरम्यान, हा वाद कोणत्या गोष्टीमुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच आता या वादानंतर बीसीसीआयकडून दोन्ही संघांवर कारवाई होणार का हे पाहावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.