National Game Goa 2023 : पणजी, राष्ट्रीय पातळीवरील रोल बॉल स्पर्धेत गोव्याचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या कोलवा येथील समा खातून हिच्या पदरी यावेळी निराशा आली. ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ती यजमान संघाचे प्रतिनिधित्व करू शकली नाही, ऐनक्षणी राखीव खेळाडूंत ठेवल्याबद्दल तिने तीव्र नाराजी व्यक्त केली.
समा व तिचे वडील मुस्लिम अन्सारी यांनी सोमवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन अन्याय झाल्याचा दावा केला. अन्सारी यांनी सांगितले, की ‘‘राष्ट्रीय पातळीवरील स्केटिंग स्पर्धेत राज्यासाठी रौप्यपदक जिंकूनही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रोल बॉल संघात राखीव खेळाडूंत निवडण्यात आले.
८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी रोल बॉल शिबिर सुरू होणार असल्याचे फोनवरून कळविण्यात आले. त्यानुसार ती शिबिरात दाखल झाली.
१५ ऑक्टोबरला समा हिला संघात निवड झाल्याचे पत्र देण्यात आले. मात्र आता तिला राखीव खेळाडूंत निवडण्यात आल्याचे कळविण्यात आले असून ती निराश झाली आहे.’’
खेळाडूचा पत्ता झारखंडमधील
अन्सारी यांनी सांगितले, की ‘‘समा हिच्या आधार कार्डवर झारखंड राज्यातील पत्ता आहे. त्यामुळे गोव्याचा संघ निवडताना तिला राखीव खेळाडूंत ठेवण्यात आल्याचे कळविण्यात आले. मात्र गेली चार-पाच वर्षे समा हेच आधार कार्ड वापरून गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहे.
हल्लीच तिने या ओळखपत्रासह राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते, आताच अचानक तिला का वगळण्यात आले हा आमचा सवाल आहे.’’
निवासी दाखला महत्त्वाचा
प्राप्त माहितीनुसार, ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या संघात ७० टक्के गोमंतकीय व ३० टक्के बाहेरगावचे असे धोरण ठरले आहे.
त्यानुसार संघ निवड झालेली आहे. गोमंतकीय खेळाडूंना संघ निवडीच्या वेळेस निवासी दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले. समा हिचे आधारकार्ड झारखंडमधील पत्त्यावर असल्यामुळे तिला गोमंतकीय खेळाडूंत गृहित धरण्यात आले नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.