न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. वेलिंग्टनला सुरू असलेल्या या सामन्याचा तिसरा दिवस न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स आणि ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन यांच्यासाठी विक्रमी ठरला.
या सामन्यात तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 51.1 षटकात अवघ्या 164 धावांवर संपुष्टात आला. पण या डावात दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या नॅथन लायनने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. तो तिसऱ्या दिवशी बाद झाला.
तसेच याच डावात न्यूझीलंडकडून फिलिप्सने 5 विकेट्सही घेतले. त्याने 16 षटकात 45 धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. त्याने उस्मान ख्वाजा, कॅमेरॉन ग्रीन, ट्रेविस हेड, मिचेल मार्श आणि ऍलेक्स कॅरी यांना बाद केले.
मधल्या फळीतील फलंदाज असलेल्या फिलिप्सकडे फिरकी गोलंदाजीचीही क्षमता आहे. तिच कला या सामन्यात न्यूझीलंडला फायदेशीर ठरली. त्यामुळे फिलिप्स न्यूझीलंडकडून मायदेशात एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा आठवा फिरकीपटू ठरला.
तसेच 16 वर्षांनंतर न्यूझीलंडकडून मायदेशात एका फिरकीपटूने एका कसोटी डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी अखेरीस न्यूझीलंडकडून मायदेशात फिरकीपटू जीतन पटेलने 2008 साली वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 5 विकेट्स घेतल्या होत्या.
न्यूझीलंडकडून जीतन पटेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्याव्यतिरिक्त मायदेशात एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स डॅनियल विट्टोरी (6 वेळा), जॉन ब्रेसवेल (3 वेळा), स्टिफन बुक (2 वेळा), ऍलेक्स मोईर (2 वेळा), थॉमस ब्रुट (1 वेळा) आणि दीपक पटेल (1 वेळा) या फिरकीपटूंनी केला आहे.
दरम्यान, फिलिप्सने या सामन्यात केवळ गोलंदाजीतच नाही, तर न्यूझीलंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करतानाही सर्वाधिक 71 धावांची खेळी केली होती.
दरम्यान, लायनने वेलिंग्टन कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याने कसोटीत 1500 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे तो एकही अर्धशतक न करता कसोटीत 1500 धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
एकही अर्धशतक न करता सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये लायनच्या पाठोपाठ केमार रोच आहे. त्याने अर्धशतकही न करता 1174 धावा केल्या आहेत. तसेच त्यानंतर वकार युनूस असून त्याने अर्धशतक न करता 1010 धावा केल्या आहेत.
याशिवाय लायनच्या नावावर कसोटीत 500 विकेट्सही आहेत. त्यामुळे तो आता कसोटीत 1500 धावा आणि 500 विकेट्स घेणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही सामील झाला आहे. यापूर्वी असा कारनामा केवळ शेन वॉर्न, अनिल कुंबळे, स्टुर्स ब्रॉड आणि आर अश्विन यांनाच करता आला आहे.
वेलिंग्टन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 383 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर न्यूझीलंडला पहिल्या डावात केवळ 179 धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 204 धावांची आघाडी मिळाली होती. पण ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 164 धावातच संपला.
त्यामुळे त्यांना न्यूझीलंडसमोर पहिल्या डावातील आघाडीसह 369 धावांचे आव्हान ठेवता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 41 षटकात 3 बाद 111 धावा केल्या आहेत. अद्याप त्यांना 258 धावांची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.