पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमातील मागील तीनपैकी दोन सामने गमावल्यामुळे मुंबई सिटी एफसीला अग्रस्थान गमवावे लागले, आता ते पुन्हा मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील. त्यादृष्टीने शुक्रवारी (ता. 7) शेवटच्या क्रमांकावरील ईस्ट बंगालविरुद्ध होणारा सामना गतविजेत्यांसाठी महत्त्वाचा असेल.
ईस्ट बंगाल व मुंबई सिटी यांच्यात लढत वास्को येथील टिळक मैदानावर होईल. ईस्ट बंगाल संघ अजूनही स्पर्धेत विजयाविना आहे, पण मागील चारपैकी तीन सामने त्यांनी बरोबरीत राखले आहेत, त्यामुळे मुंबई सिटीस शुक्रवारच्या लढतीत सावधच राहावे लागेल. अंतरिम प्रशिक्षक रेनेडी सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालला बंगळूरविरुद्ध स्वयंगोल स्वीकारल्यामुळे विजय हुकला होता. सध्या अव्वल स्थानी असलेल्या हैदराबाद एफसीलाही त्यांनी त्यापूर्वी गोलबरोबरीत रोखले होते. सध्या ईस्ट बंगालचे नऊ लढतीतून पाच बरोबरी व चार पराभवासह पाच गुण असून ते अकराव्या क्रमांकावर आहेत.
मुंबई सिटीला यापूर्वीच्या तीन लढतीतून फक्त एकाच गुणाची कमाई करता आली. ओडिशा एफसी व केरळा ब्लास्टर्सने त्यांना हरविले, तर नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघ ईस्ट बंगालला निश्चितच कमी लेखणार नाही. मुंबई (Mumbai) सिटीचा बचाव सध्या तणावाखाली आहे. तीन लढतीत त्यांनी तब्बल 10 गोल स्वीकारले आहेत. नऊ लढतीत पाच विजय, एक बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह 16 गुण नोंदविले असून हैदराबाद (Hyderabad) एफसीचेही तेवढेच गुण आहे. ईस्ट बंगालला नमविल्यास मुंबई सिटीला पुन्हा अव्वल स्थान मिळेल.
प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान उभारू ः रेनेडी
‘‘मागील सामन्यात खेळाडूंचा दमदार खेळ पाहून आनंद झाला. आता आत्मविश्वासाने खेळ करण्याचा आमचा निर्धार आहे. मुंबई सिटी संघ स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमण असलेला संघ आहे. त्यांच्यासाठी हा सामना आम्हाला आव्हानात्मक करायचा आहे. आम्ही त्यांना गोल करण्याची संधी दिली, तर ते ती सोडणार नाहीत,’’ असे ईस्ट बंगालचे अंतरिम प्रशिक्षक रेनेडी म्हणाले. ‘‘यापूर्वीच्या सामन्यात आमच्याकडून चुका झाल्या. मागील तीन सामन्यांत आमची कामगिरी चांगली झालेली नाही, परंतु एकंदरीत विचार केल्यास आम्ही चांगला खेळ केला आहे. आम्ही सातत्यपूर्ण कामगिरीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे,''असे मुंबई सिटीचे प्रशिक्षक बकिंगहॅम यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.