World Cup 2023 पूर्वी भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह संघांना सतावतेय दुखापतींची चिंता, डझनभर खेळाडू जखमी

World Cup 2023: वर्ल्डकप आता जवळपास ३ आठवड्यांवर आला असतानाच अनेक संघांना खेळाडूंच्या दुखापतीची चिंता सतावत आहे.
Cricketers Injury
Cricketers InjuryDainik Gomantak

Multiple injury scares for ahead of ODI Cricket World Cup 2023:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा आता तोंडावर आली आहे. ५ ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. तर, २९ सप्टेंबरपासून सराव सामने खेळले जाणार आहे. अशात संघांच्या अंतिम तयारीला सुरुवात झाली आहे.

पण, ही तयारी करताना संघांना खेळाडूंच्या दुखापतीचीही चिंता सतावत आहे. सध्या अनेक संघांतील मिळून डझनभर तरी खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. वर्ल्डकप जवळ आल्याने सर्वच संघ मिळेल ती संधी साधून तयारी करत आहे. त्यामुळे अनेक मालिका सध्या जोशात सुरू असल्याचे दिसत आहे.

एकीकडे आशिया चषक सुरू आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे, तसेच इंग्लंड-न्यूझीलंडमध्येही मालिका सुरू आहे. अजूनही काही मालिका वर्ल्डकपपूर्वी होणार आहेत. पण यादरम्यान खेळाडूंचा फिटनेस योग्य ठेवण्यावर आणि त्यांना दुखापतीपासून दूर ठेवण्यावर संघांचे लक्ष आहे.

Cricketers Injury
World Cup 2023: 'तो जगातील दुसऱ्या संघात असता, तर प्लेइंग-11मध्ये असता' भारताच्या संघनिवडीवर भज्जी बरसला

नुकतेच ऑस्ट्रेलियचा स्टार फलंदाज ट्रेविस हेडच्या हाताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दुखापत झाली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल असे अनुभवी खेळाडूही दुखापतीतून सावरत असून अद्याप त्यांचेही पुनरागमन होणे बाकी आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमा आणि वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किया हे देखील जखमी असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील सामन्यांना मुकले आहेत. याशिवाय न्यूझीलंडलाही अनुभवी आणि यशस्वी गोलंदाज टीम साऊथीचे बोट फ्रॅक्टर झाल्याने चिंता आहे.

इंग्लंडविरुद्ध नुकतेच वनडे सामना खेळताना त्याला दुखापत झाली आहे. त्याच्यासह डॅरिल मिचेललाही बोटाला दुखापत झाली आहे. तसेच त्यांचा कर्णधार केन विलियम्सनही गुडघ्याच्या मोठ्या दुखापतीतून पुनरागमन करणार आहे, त्याचेही अद्याप पुनरागमन झालेले नाही.

Cricketers Injury
जरा हटके! न्यूझीलंडची अनोखी युक्ती, कुटुबियांनी केली World Cup 2023 साठी संघाची घोषणा

इतकेच नाही, तर आशिया चषक सुरू असताना पाकिस्तानचे दोन प्रमुख गोलंदाज नसीम शाह आणि हॅरिस रौफ दुखापतग्रस्त झाले आहेत. नसीम वर्ल्डकपचे सामनेही मुकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर श्रीलंकेलाही आशिया चषकादरम्यान प्रमुख फिरकीपटू महिश तिक्षणाला दुखापत झाल्याने धक्का बसला आहे.

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. एप्रिलमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, त्याने आशिया चषकातून पुनरागमन केले होते, पण दोन सामन्यांनंतर पुन्हा त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोके वर काढल्याचे दिसले. अक्षर पटेललाही बांगलादेशविरुद्ध खेळताना हाताला चेंडू लागला आहे.

गेल्या काही दिवसात दुखापतींची वाढणारी यादी संघांसाठी डोकेदुखीही वाढवत आहे. कारण आता वर्ल्डकप अगदीच जवळ आला असून प्रमुख खेळाडूंच्या दुखापती संघांसाठी मोठा अडथळा ठरू शकतात. त्यामुळे आता संघांना प्रमुख खेळाडूंना दुखापतीपासून दूर ठेवण्याकडे आणि दुखापतग्रस्त खेळाडूंना लवकरात लवकर तंदुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com