MS Dhoni Will Play his 250th IPL Game in Final: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीच्या नावावर मोठा विक्रम होणार आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना हा धोनीचा आयपीएल कारकिर्दीतील 250 वा सामना ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी मैदानात उतरताच धोनी आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरणार आहे.
सध्या (27 मे 2023 पर्यंत) सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनीपाठोपाठ रोहित शर्मा आहे. त्याने 243 आयपीएल सामने खेळले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू (27 मे 2023 पर्यंत)
249 सामने - एमएस धोनी
243 सामने - रोहित शर्मा
242 सामने - दिनेश कार्तिक
237 सामने - विराट कोहली
225 सामने - रविंद्र जडेजा
धोनीने आत्तापर्यंत खेळलेल्या 249 आयपीएल सामन्यांपैकी 219 सामने चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळले आहेत. तसेच 2016 आणि 2017 या दोन हंगामात चेन्नईवर बंदी असताना तो रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून 30 सामने खेळला आहे.
धोनीने 2008 ते 2015 सलग 8 हंगामात चेन्नईचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तो दोन हंगाम पुण्याकडून खेळला. पण 2018 मध्ये चेन्नईचे आयपीएलमध्ये पुनरागमन झाल्यानंतर तो पुन्हा चेन्नई संघात सामील झाला. त्यानंतर तो अद्याप चेन्नईकडूनच खेळत आहे.
धोनी गेल्या 16 हंगामांपैकी चेन्नईकडून 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018, 2019, 2021 आणि आताय यावर्षीही आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे. तसेच त्याने 2017 साली पुण्याकडून अंतिम सामना खेळला होता.
त्यामुळे यंदा तो 11व्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. यातील 2010, 2011, 2018 आणि 2021 यावर्षी धोनीने विजेतेपदाला गवसणी घातली आहे
धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 249 सामने खेळले असून 39.09 सरासरीने आणि 135.96 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 178 विकेट्स (137 झेल आणि 41 यष्टीचीत) घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.