Mirabai Chanu won Silver Medal: भारताची ऑलिम्पिक पदक विजेती मिराबाई चानूने पुन्हा एकदा भारताला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. तिने जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 49 वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
तिने एकूण 200 किलोग्रॅम वजन उचलून हा पराक्रम केला. यामध्ये तिने 87 किलोग्रॅम स्नॅच प्रकारात वजन उचलले आणि 113 किलोग्रॅम क्लिन अँड जर्क प्रकारात वजन उचलले. पण, या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या चीनच्या जियांग हुइहुआपेक्षा 6 किलोग्रॅम वजन कमी उचलले. तिने स्नॅच प्रकारात हे वजन कमी उचलले.
हुइहुआने स्नॅचमध्ये 93 किलोग्रॅम वजन उचलले होते, तर क्लिन अँड जर्क प्रकारात मिराबाई चानू इतकेच म्हणजे 113 किलोग्रॅम वजन उचलले होते. तसेच चीनच्याच होवू झीहुआने कांस्यपदक जिंकले. तिने एकूण 198 किलोग्रॅम वजन उचलले. विशेष म्हणजे झीहुआने 49 वजनीगटात टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
मिराबाईला स्नॅच प्रकारात थोडा संघर्ष करावा लागला. तिने पहिल्या प्रयत्नात 84 किलोग्रॅम वजन उचलले, पण 87 किलोग्रॅम उचलण्याचा तिचा दुसरा प्रयत्न चुकला. पण तिने तिसऱ्या प्रयत्नात पुन्हा 87 किलोग्रॅम वजन उचलले. मात्र असे असले तरी तिने क्लिन अँड जर्क प्रकारात शानदार कामगिरी केली. तिने या प्रकारातही रौप्य पदक जिंकले आहे.
मिराबाईने यापूर्वी 2017 साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच तिने यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. ती गेल्या दोन वर्षापासून स्नॅच प्रकारात 90 किलोग्रॅम वजन उचलण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच आता जागतिक अंजिंक्यपद स्पर्धेतील सहभागामुळे तिचा पॅरिस ऑलिम्पिकला पात्र ठरण्यासाठी मार्ग सोपा झाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.