KL Rahul Injury: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना होत आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याच्या सुरुवातीलाच लखनऊ संघाला मोठा धक्का बसला आहे.
लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुलला या सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने मैदानातून अचानक बाहेर जावे लागले. झाले असे की बेंगलोरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली सलामीला फलंदाजीला उतरले.
या डावाच्या दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसने सुरेख कव्हर ड्राईव्हचा फटका मारला, ज्यावर बेंगलोरला चौकारही मिळाला. पण हा चौकार अडवण्यासाठी धावत असताना केएल राहुलचा उजव्या पायात अचानक वेदना झाल्या आणि तो मैदानावरच खाली पडला. तो बाहेर जात असताना स्टेडियममध्ये उपस्थित असणारी त्याची पत्नी अथिया शेट्टीही थोडी टेंशनमध्ये दिसत होती.
त्यानंतर लखनऊच्या वैद्यकीय पथकाने येऊन त्याच्या दुखापतीची तपासणी केली. पण त्याची दुखापत थोडी गंभीर दिसत असल्याने ते त्याला मैदानातून बाहेर घेऊन गेले. तो बाहेर गेल्याने कृणाल पंड्या लखनऊ संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे.
दरम्यान, त्याची दुखापत कितपत गंभीर आहे, याबद्दल लखनऊ संघाकडून माहिती देण्यात आलेली नाही. तसेच हा सामना काही वेळासाठी पावसाच्या व्यत्ययामुळे थांबला, तोपर्यंत तरी केएल राहुल मैदानात आलेला नव्हता.
पावसाचा व्यत्यय येईपर्यंत बेंगलोरने 15.2 षटकात 4 बाद 93 धावा केल्या होत्या. बेंगलोरकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने चांगली सलामी दिली. या दोघांनी 62 धावांची भागीदारी केली. पण विराट 31 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल आणि सुयश प्रभुदेसाई यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. पण फाफ डू प्लेसिस 40 धावांवर नाबाद खेळत होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.