Lionel Messi Birthday: स्वप्नवत कारकिर्द घडवणाऱ्या मेस्सीच्या आयुष्यातील 5 सुवर्णक्षण एकदा पाहाच

लिओनल मेस्सी 24 जूनला त्याचा वाढदिवस साजरा करत असून त्याच्या कारकिर्दीतील 5 सुवर्णक्षणांवर टाका नजर.
Lionel Messi
Lionel MessiDainik Gomantak
Published on
Updated on

Lionel Messi Best Moments: फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू लिओनल मेस्सी आज म्हणजेच 24 जूनला त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. हा वाढदिवस मेस्सीसाठी खास आहे, कारण यंदाचा वाढदिवस तो त्याचे विश्वविजयाचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर वर्ल्डचॅम्पियन म्हणून करत आहे.

मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत जवळपास एखाद्या खेळाडूने स्वप्न बघावीत असे सर्व यश मिळवले आहे. त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रमही आहेत. तरी त्याच्यासाठी कारकिर्दीतील सर्वात खास दिवस ठरला तो 18 डिसेंबर 2022. याच दिवशी त्याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने फ्रान्सला पराभूत करत फिफा वर्ल्डकपवर नाव कोरले.

त्याने अंतिम सामन्यात 2 गोल करण्याबरोबरच संपूर्ण स्पर्धेत 7 गोल आणि 3 असिस्ट केले. त्यामुळे त्याला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला. हा पुरस्कार दोनवेळा जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी त्याने 2014 साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेतही हा पुरस्कार जिंकला होता.

वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली एफसी ग्रँडोलीमधून फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मेस्सीने नंतर नेवेल्स ओल्ड बॉयसाठी लहानपणी बराच काळ फुटबॉल खेळले. पण वयाच्या 13 व्या वर्षी तो बार्सिलोनाला गेला. त्याला ग्रोथ डेफिशियन्सी आजार होता. पण त्याच्यातील कौशल्य पाहून बार्सिलोनाने त्याच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला.

मेस्सीने बार्सिलोनाच्या वरिष्ठ संघाकडून 2004 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. मेस्सीने त्याचवर्षी 20 वर्षांखालील संघाकडून अर्जेंटिनासाठीही पदार्पण केले.

त्याने 2005 मध्ये अर्जेंटिनाकडून 20 वर्षांखालील वर्ल्डकपही जिंकला. या वर्ल्डकपमध्येही मेस्सीने महत्त्वाचे योगदान दिले. पुढे जाऊन मेस्सीने अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघातही जागा मिळवली आणि तो कर्णधारही झाला.

त्याने 2008 मध्ये बिजिंगला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिना संघासह सुवर्णपदक जिंकले.

तसेच 2021 मध्ये कोपा अमेरिका ही स्पर्धाही जिंकली. विशेष म्हणजे 2016 साली कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला पराभव स्विकारावा लागल्यानंतर मेस्सीने निवृत्तीही घोषित केली होती. पण नंतर त्याने निवृत्तीतून माघार घेतली.

मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक 7 वेळा मानाचा बॅलन डी'ओर पुरस्कारही जिंकला. आत्तापर्यंत कोणत्याही खेळाडूला 7 वेळा हा पुरस्कार जिंकता आलेला नाही. मेस्सीने याशिवाय देखील अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.

तो फिफाचा दोन वेळा सर्वोत्तम खेळाडू ठरला, त्याने सहा वेळा युरोपियन गोल्डन शुज आपल्या नावे केला. तसेच तो ला लीगामधील 9 वेळा व्हॅल्युएबल खेळाडू ठरला, तर दोन वेळा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूही ठरला.

त्याने बार्सिलोनासाठी 10 वेळा ला लीगा, 4 वेळा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी, 7 वेळा कोपा डेल रे, 8 वेळा सुपरकोपा डी एस्पाना, 3 क्लब वर्ल्डकप आणि 3 युरोपियन सुपर कप या स्पर्धांचे विजेतेपद जिंकले.

मेस्सी 17 वर्षे बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर 2021 मध्ये पॅरिस-सेंट जर्मेन संघात सामील झाला. या क्लबकडून त्याने फ्रेंच सुपर कप आणि लीग 1 चे विजेतेपद जिंकले. आता मेस्सी इंटर मियामी क्लबकडून खेळताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com