पणजी : अनुभवी गोमंतकीय फुटबॉल गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याचा करार हैदराबाद एफसीने वाढविला आहे. आयएसएल स्पर्धेतील गतविजेत्या संघात तो आणखी दोन वर्षे असेल.
हैदराबाद एफसीने कट्टीमणीला 2023-24 मोसमाअखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे शुक्रवारी जाहीर केले. या वर्षी मार्चमध्ये हैदराबादने केरळा ब्लास्टर्सला हरवून आयएसएल स्पर्धा जिंकली. त्यावेळी पेनल्टी शूटआऊटमध्ये अतिशय दक्ष गोलरक्षण केलेला कट्टीमणी हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. 33 वर्षीय गोलरक्षक आयएसएल अंतिम लढतीचा मानकरी ठरला होता. त्याने चार पेनल्टी फटके अडवून हैदराबादचे विजेतेपद साकारण्यात मोलाचा वाटा उचलला.
‘‘हैदराबाद एफसीच्या नव्या करारावर सही करताना मला खूप आनंद होत आहे. माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल क्लबचा कृतज्ञ आहे. आमचा समूह अविश्वसनीय असून एका कुटुंबाप्रमाणे आहे. भविष्यात आणखी खूप यश प्राप्त करण्याचा विश्वास वाटतो,’’ असे कट्टीमणी याने सांगितले. संधी देत आत्मविश्वास उंचावल्याबद्दल त्याने प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांचेही आभार मानले. आयएसएल स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे कट्टीमणीस भारतीय फुटबॉल संघातही जागा मिळाली. हल्लीच झालेल्या एएफसी आशिया कप स्पर्धेच्या पात्रता फेरीत तो भारतीय संघात होता.
आयएसएलमधील दीर्घानुभवी
लक्ष्मीकांत कट्टीमणी आयएसएल स्पर्धेतील दीर्घानुभवी गोलरक्षक आहे. 2014 पासून तो 81 आयएसएल सामने खेळला असून 42 सामन्यांत त्याने हैदराबादचे प्रतिनिधित्व केले आहे. आयएसएल कारकिर्दीत त्याने एकूण 14 सामन्यांत एकही गोल स्वीकारला नाही, त्यापैकी नऊ वेळा त्याने हैदराबादतर्फे अशी कामगिरी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.