South Africa vs India, 3rd T20I Match at Johannesburg, Kuldeep Yadav 5 Wickets on 29th Birthday:
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात गुरुवारी (14 डिसेंबर) टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. जोहान्सबर्गच्या न्यू वाँडरर्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 106 धावांनी विजय मिळवला, त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली.
भारताच्या या विजयात कुलदीप यादवने 5 विकेट्स घेत मोठा वाटा उचलला. विशेष म्हणजे गुरुवारी कुलदीपचा 29 वा वाढदिवस देखील होती.
कुलदीप यादवने या सामन्यात 2.5 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला 13.5 षटकात 95 धावांवरच रोखण्यात भारतीय संघाला यश मिळाले.
दरम्यान, कुलदीपने केलेली कामगिरी ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील वाढदिवशी केलेले सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये वाढदिवशी 5 विकेट्स घेणारा कुलदीप पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
यापूर्वी वाढदिवशी पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगाच्या नावावर होता. त्याने कोलंबोमध्ये 2021 साली वाढदिवशी भारताविरुद्ध खेळताना 9 धावांत 4 विकेट्स घेतले होते.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये वाढदिवशी भारताच्या केवळ तीन गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे. कुलदीपपूर्वी युवराज सिंग आणि रविंद्र जडेजा यांनी वाढदिवशी भारताकडून टी20 मध्ये गोलंदाजी केली होती.
युवराजने 2009 मध्ये वाढदिवशी मोहालीला श्रीलंकेविरुद्ध टी20 सामन्यात गोलंदाजी करताना 23 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच जडेजाने 2020 साली वाढदिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबादला झालेल्या टी20 सामन्यांत 30 धावांत 1 विकेट घेतली होती.
5/17 - कुलदीप यादव (भारत वि. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2023)
4/9 - वनिंदू हसरंगा (श्रीलंका वि. भारत, कोलंबो, 2021)
4/21 - इम्रान ताहीर (दक्षिण आफ्रिका वि. नेदरलँड्स, चितगाव, 2014)
4/25 - कार्तिक मय्यपन (युएई वि. आयर्लंड, दुबई, 2021)
दरम्यान कुलदीपने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 साली इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरला झालेल्या टी२० सामन्यात त्याने 24 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच कुलदीप आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून दोन वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भुवनेश्वर कुमारनंतरचा दुसराच गोलंदाज आहे. भुवनेश्वरनेही भारताकडून दोनदा टी20 मध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.
या दोघांव्यतिरिक्त दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांनी भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी एकदा 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.