VIDEO: ऑटोग्राफ देण्यासाठी गेला अन्... चाहत्यांनी थेट कृणाल पांड्याच्या अंगावर भिरकावला बूट; थोडक्यात बचावला, पाहा व्हायरल व्हिडिओ

Krunal Pandya Shoe Incident: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू आणि चाहत्यांमधील नातं नेहमीच खास असतं. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची एक झलक पाहण्यासाठी, त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मैदानाबाहेर गर्दी करतात.
Krunal Pandya Shoe Incident
Krunal Pandya Shoe IncidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू आणि चाहत्यांमधील नातं नेहमीच खास असतं. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची एक झलक पाहण्यासाठी, त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने मैदानाबाहेर गर्दी करतात. मात्र, काही चाहत्यांच्या चुकीच्या वर्तनामुळे या नात्याला गालबोट लागते. असाच एक धक्कादायक प्रकार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेदरम्यान घडला आहे. बडोदा संघाचा कर्णधार आणि भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याच्या दिशेने एका चाहत्याने चक्क बूट फेकला. या घटनेत क्रुणालला दुखापत झाली नाही. मात्र, दुसरा बूट अगदी जवळून गेल्याने तो थोडक्यात बचावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑटोग्राफ देण्यासाठी गेला अन् चाहत्याने फेकला बूट

ही घटना बडोदा आणि झारखंड यांच्यातील सामन्यानंतर घडली. कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने झारखंडवर पाच विकेट्सनी विजय मिळवला होता. सामना संपल्यानंतर सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी कृणाल पुढे आला. चाहत्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत तो ऑटोग्राफ देत होता.

याचवेळी गर्दीतील एका व्यक्तीने कृणालच्या दिशेने बूट फेकला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कृणाल काही क्षणांसाठी आश्चर्यचकित झाला. त्याने पहिला बूट पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर लगेचच दुसरा बूट त्याच्या दिशेने फेकण्यात आला. यावेळी बूट क्रुणालच्या अगदी जवळून गेल्याने मोठा अनर्थ टळला.

क्रुणाल पंड्या संतापला, पण दाखवला संयम

स्वतःच्या दिशेने वारंवार बूट फेकण्याचा प्रकार घडल्यानंतर कृणाल संतापलेला दिसला. त्याने बूट फेकणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवत त्याला स्पष्ट इशारा दिला. मैदानावर खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे क्रुणालची नाराजीही व्हिडिओमध्ये दिसून येते.

मात्र, या प्रकारानंतरही कृणालने आपला संयम गमावला नाही. काही क्षणांत स्वतःला शांत करत त्याने इतर चाहत्यांना ऑटोग्राफ दिले. एका व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनामुळे उपस्थित असलेल्या इतर चाहत्यांना निराश न करण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्यामुळे या घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

क्रुणालच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाची दमदार कामगिरी

दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये कृणालच्या नेतृत्वाखाली बडोदा संघ चांगली कामगिरी करत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चंदीगडविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर संघाने जोरदार पुनरागमन केले.

बडोदा संघाने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे संघाच्या खात्यात 20 गुण जमा झाले आहेत. तसेच +2.207 असा नेट रनरेट राखत बडोदा संघाने आपल्या गटात अव्वल स्थान मिळवले आहे. मैदानाबाहेर घडलेल्या या धक्कादायक घटनेपेक्षा मैदानातील कामगिरीमुळेही बडोदा संघ चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.