KL Rahul responds to criticism after scoring Century in South Africa vs India Centurion Test:
मंगळवारपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शतकी खेळी केली. या खेळीनंतर त्याने त्याच्यावर होणाऱ्या टीकेला तो कसा सामोरा जातो, यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 67.4 षटकात सर्वबाद 245 धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने 137 चेंडूत 101 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय या डावात भारताकडून कोणालाही 40 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. त्यामुळे फलंदाजीसाठी आव्हानात्मक खेळपट्टीवर केएल राहुलने दिलेल्या झुंझीबद्दल त्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, तो दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याने गेल्या काही महिन्यात बऱ्याचदा झालेल्या टीकेबद्दल भाष्य केले. त्याने म्हटले आहे की त्या टीकेवर प्रतिक्रिया देऊन काहीच मिळणार नाही. त्याच्या खराब फॉर्मवर आणि खेळण्याच्या गतीवरही गेल्या काही महिन्यात टीका झाली आहे.
याबद्दल बोलताना केएल राहुल म्हणाला, 'लोकांना जे बोलायचे आहे, ते बोलणारच आहेत. तुम्ही जर सार्वजनिक क्षेत्रात असता, तेव्हा तुमची कामगिरीच तुम्हाला टीकारांपासून वाचवू शकते.'
केएल राहुल पुढे म्हणाला, 'एक माणूस म्हणून, क्रिकेटपटू म्हणून आणि व्यक्ती म्हणून तुम्हाला प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी आव्हान मिळणार आहे. सोशल मीडिया एक दबाव आहे.'
'आज मी शतक केले, त्यामुळे लोक कौतुक करतील. तीन-चार महिन्यांपूर्वी सर्वजण माझ्यावर टीका करत होते. त्यामुळे हा खेळाचा एक भाग आहे, पण तुम्ही असे म्हणू शकत नाही की त्याचा तुमच्यावर परिणाम होत नाही. त्याचा परिणाम होतो. पण लवकरच तुमच्या लक्षात येते की त्यापासून दूर राहाणे तुमच्या खेळासाठी आणि मानसिकतेसाठी चांगले असते.'
याशिवाय 2023 वर्षाच्या मधल्या काळात केएल राहुल दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. या वेळेचा त्याला स्वत:वर काम करण्यासाठी फायदा झाल्याचेही त्याने सांगितले.
केएल राहुल म्हणाला, 'प्रत्येक व्यक्तीला आपला मार्ग शोधावा लागतो. जेव्हा मला दुखापत झाली होती आणि मी खेळापासून बराच काळ दूर होतो, तेव्हा मी स्वत:वर काम केले. माझ्यावर या सर्व गोष्टींचा परिणाम होणार नाही, यासाठी मी काम केले. इतक्या गोष्टी होत असताना तुम्हाला तुमचे मुळ व्यक्तिमत्त्व कायम करणे अवघड असते.'
तुमचे स्वत:चे एक व्यक्तिमत्त्व, गुण आणि स्वभाव असतो. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता, तेव्हा त्या गोष्टी बदलत राहातात.'
'टीकेचा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होत असतो आणि जर कोणी हे नाकारत असेल, तर तो खोटे बोलत आहे. तुम्ही कामगिरी करू शकता किंवा जर तुम्हाला तुमची मर्यादा ठरवता येत असेल, तर तुमची मानसिकता बदसू शकता. ज्या गोष्टींबद्दल बोलले जात आहे आणि जी टीका होत आहे, ते पूर्णपणे टाळू शकण्याइतपत कोणीच महान नाही.'
दरम्यान, या सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने 66 षटकात 5 बाद 256 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गारने नाबाद 140 धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडे सध्या 11 धावांची आघाडी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.