पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेतील गतविजेत्या मुंबई सिटीला रविवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर जबरदस्त हादरा बसला. उत्तरार्धात त्यांना दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्यापूर्वीच केरळा ब्लास्टर्सने त्यांच्यावर दोन गोलची आघाडी घेत वर्चस्व राखले होते. अखेरीस अव्वल स्थानावरील संघास सामना 0-3 फरकाने गमवावा लागला.
केरळा (Kerala) ब्लास्टर्सविरुद्धच्या लढतीपूर्वी सलग चार सामने जिंकलेल्या मुंबई (Mumbai) सिटीने गुणतक्त्यात 15 गुणांसह अग्रस्थान मिळविले होते. त्यांना स्पर्धेतील सातव्या लढतीत दुसरा पराभव पत्करावा लागल्यामुळे गुणतक्त्यात मोठी आघाडी घेण्याचे डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचे स्वप्न भंगले.
केरळा ब्लास्टर्सने सहा लढतीतील दुसरा सामना जिंकला. त्यामुळे त्यांचे गुणतक्त्यातील स्थानही सुधारले. नऊ गुणांसह ते पाचव्या स्थानी आले आहेत. सर्बियन इव्हान व्हुकोमानोविच यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने नियोजनबद्ध खेळत बलाढ्य प्रतिस्पर्ध्यास नामोहरम केले.
केरळा ब्लास्टर्सला 27व्या मिनिटास आघाडी मिळाली. सहल समद याने मोसमातील दुसरा गोल नोंदवत संघाचे गोलखाते खोलले. उत्तरार्धाची सुरवात सनसनाटी ठरली. 47व्या मिनिटास स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याने स्पर्धेतील वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून केरळा ब्लास्टर्सची आघाडी 2-0 अशी वाढविली. 50व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सच्या जॉर्गे डायझ याला सेनेगलचा खेळाडू मुर्तदा फॉल याने मागून धोकादायक टॅकल केले.
सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे फॉलला मैदान सोडावे लागले व मुंबई सिटीचे सामर्थ्य दहा खेळाडूंवर आले. यावेळी रेफरी प्रांजल बॅनर्जी यांनी पेनल्टी फटक्याची खूण केली. अर्जेंटिनाच्या डायझ याने पेनल्टी फटका अचूक मारताना वेगावर भर देत गोलरक्षक महंमद नवाझ याला चकविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.