IND vs NZ: न्यूझीलंडने शुक्रवारी भारताला वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑकलंड येथे झालेल्या या पहिल्या वनडेत न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम आणि केन विलियम्सन यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी रचत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. यासह त्यांनी काही खास विक्रम आपल्या नावे केले.
भारताने दिलेल्या 307 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एका क्षणी न्यूझीलंडची अवस्था 3 बाद 88 धावा अशी होती. पण त्याचवेळी टॉम लॅथम आणि केन विलियम्सन यांनी संघाच्या फलंदाजीची जबाबदारी खांद्यावर घेत भारतीय गोलंदाजांना पुढे विकेट मिळणार नाही याची काळजी घेतली.
लॅथम - विलियम्सनची विक्रमी भागीदारी
लॅथम आणि विलियम्सन (Kane Williamson and Tom Latham) यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 221 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी करताना लॅथमने 104 चेंडूत नाबाद 145 धावांची खेळी केली, तर विलियम्सनने 98 चेंडूत 94 धावांची खेळी केली.
या दोघांनी रचलेली ही 221 धावांची नाबाद भागीदारी भारताविरुद्ध वनडेत न्यूझीलंडकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या नावावर होता. त्यांनी मुंबईत 2017 मध्ये 200 धावांची भागीदारी भारताविरुद्ध केली होती.
याबरोबरच वनडेत धावांचा पाठलाग करताना चौथ्या किंवा त्याखालील विकेटसाठी नाबाद 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करण्याच्या यादीतही विलियम्सन आणि लॅथमची दुसरी जोडी ठरली आहे. यापूर्वी ओएन मॉर्गन आणि रवी बोपारा यांनी डब्लीन येथे 2013 मध्ये आयर्लंडविरुद्ध पाचव्या विकेटसाठी नाबाद 226 धावांची भागीदारी रचली होती.
लॅथमचा मोठा पराक्रम
लॅथमने नाबाद 145 धावांची शतकी खेळी करत मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. तो आता भारताविरुद्ध वनडेत सर्वाधिक धावांची खेळी करणारा न्यूझीलंडचा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम नॅथन ऍस्टलच्या नावे होता. त्याने 1999 मध्ये राजकोट येथे खेळताना 120 धावा केल्या होत्या.
याशिवाय न्यूझीलंड संघानेही केवळ दुसऱ्यांदाच भारताविरुद्ध वनडेत 300 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. यापूर्वी 2020 मध्ये हॅमिल्टन येथे भारताविरुद्ध 348 धावांचा पाठलाग न्यूझीलंडने यशस्वी पूर्ण केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.