Japan vs Spain: जपानचा स्पेनला पराभवाचा धक्का, तर माजी विश्वविजेत्या जर्मनीचीही 'एक्झिट'

फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये गुरुवारी रात्री जपानने स्पेनचा पराभव केल्यानंतर हे दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले, मात्र त्यांच्याच ग्रुपमधील जर्मनीला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.
Japan
Japan Dainik Gomantak

Japan vs Spain: कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत गुरुवारी रोमांचक सामने झाले. ग्रुप इ मधील झालेल्या सामन्यांत नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. दरम्यान, गुरुवारी ग्रुप इ मध्ये जपान विरुद्ध स्पेन आणि कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी असा सामना पार पडला. यातील जपानने स्पेनवर 2-1 असा विजय मिळवला, तर जर्मनीने कोस्टारिकावर 4-2 गोलफरकाने विजय मिळवला.

या निकालांमुळे ग्रुप इ मधून 2014 च्या विश्वविजेत्या जर्मनीने विजय मिळवूनही गोलफरकामुळे स्पेनच्या खाली राहिल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले. त्यामुळे या ग्रुपमधून जपानने अव्वल स्थान मिळवत आणि स्पेन दुसऱ्या क्रमांकावर राहिल्याने या दोन्ही संघांनी अंतिम 16 संघांमध्ये स्थान मिळवले आहे.

खरंतर ग्रुप इ मधील चारही संघांसाठी गुरुवारी होणारे सामने महत्त्वाचे होते. त्यातही जपानच्या विजयात व्हिडिओ असिस्टंट रेफ्रीची (व्हीएआर) मोठी भूमिका राहिली.

Japan
FIFA World Cup 2022 पाहण्यासाठी 5 मुलांच्या आईचा थेट महिंद्रा थारमधून केरळ ते कतार प्रवास

सामन्यात स्पेनने जपान विरुद्ध चांगली सुरुवात केली होती. त्यांच्याकडून पहिल्या हाफमध्ये 11 व्या मिनिटाला अल्वारो मोराटाने गोल करत आघाडी मिळवून दिली होती. पण ही आघाडी स्पेनला दुसऱ्या हाफमध्ये टिकवून ठेवता आली नाही.

दुसऱ्या हाफमध्ये जपानने चांगला खेळ दाखवला. 48 व्या मिनिटाला रित्सु दोआनने जपानला बरोबरी साधून दिली. पण नंतर 51 व्या मिनिटाला ओ तनाकाने केलेला गोल वादग्रस्त ठरला. महत्त्वाचे म्हणजे हाच गोल जपानला विजय मिळवून देण्यात आणि जर्मनीला स्पर्धेतून बाहेर करण्यात महत्त्वाचा ठरला.

हा गोल होण्यापूर्वी जपानच्या काओरू मिटोमाने बॉल मारण्यापूर्वी तो बॉल ऑऊट ऑफ प्ले गेल्याची शक्यता होती. पण, व्हीएआरवर बराचवेळ तपासल्यानंतर जपानला दुसरा गोल देण्यात आला आणि अखेर जपानने विजय मिळवत बाद फेरीतील स्थान पक्के केले.

त्यामुळे जपानचे 6 गुण झाले, तर स्पेन आणि जर्मनी यांचे प्रत्येकी 4 गुण झाले. पण गोलफरकामुळे जर्मनी तिसऱ्या आणि स्पेन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कोस्टारिका 3 गुणांसह अखेरच्या क्रमांकावर राहिले.

आता फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये (FIFA World Cup 2022) जपान बाद फेरीत क्रोएशियाविरुद्ध 5 डिसेंबर रोजी खेळेल, तर स्पेन 6 डिसेंबर रोजी मोरोक्कोचा सामना करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com