India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam, James Anderson Record:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू असून दुसरा सामना विशाखापट्टणमला शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरू झाला आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने 41 वर्षीय जेम्स अँडरसनलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान त्याने काही विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
अँडरसन या सामन्यात खेळत असल्याने त्याच्या नावावर सलग 22 व्या वर्षी कसोटी सामना खेळण्याचा विक्रम झाला आहे. तो केवळ तिसराच खेळाडू ठरला आहे, जो सलग 22 वर्षे कसोटी क्रिकेट खेळत आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1989 ते 2013 असे सलग 25 वर्षे प्रत्येकी एक तरी कसोटी सामना खेळला आहे. तसेच शिवनारायण चंद्रपॉलने देखील 1994 ते 2015 असे सलग 22 वर्षी किमान एकतरी कसोटी सामना खेळला आहे.
अँडरसनने मे 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध लॉर्ड्सवर इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. तेव्हा पासून 2024 पर्यंत त्याने प्रत्येक वर्षी किमान एकतरी कसोटी सामना खेळला आहे.
41 वर्षीय जेम्स अँडरसन केवळ 22 वर्षे सलग कसोटी क्रिकेट खेळलाच नाही, तर त्याने सलग 22 वर्षे विकेटही घेतली आहे. अँडरसनने शुक्रवारी सुरू झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्याच सत्रात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलची विकेट घेतली.
त्यामुळे त्याने सलग 22 व्या वर्षी कसोटीत विकेट घेण्याचा पराक्रम नोंदवला. म्हणजेच अँडरसनने 2003 साली पदार्पण केल्यापासून 2024 पर्यंत प्रत्येकवर्षी कसोटीत किमान एकतरी विकेट घेतली आहे. तो सलग 22 वर्षे कसोटीत विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज आहे.
दरम्यान, भारताविरुद्ध विशाखापट्टणमला होत असलेल्या सामन्यापूर्वी अँडरसनने 183 कसोटी सामने खेळले होते, ज्यात त्याने 690 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला कसोटीत 700 विकेट्ससाठी आणखी 10 विकेट्सचीच गरज आहे. आत्तापर्यंत कसोटीत केवळ मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांनाच 700 विकेट्सचा टप्पा पार करता आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.